KisanPutra Aandolan : दरवर्षी 19 मार्चला किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं एक दिवस अन्नत्याग आंदोलन केलं जातं. 19 मार्च 1986 ला साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. ही राज्यातील शेतकरी आत्महत्येची पहिली घटना होती.  या घटनेच्या स्मृतीपित्यर्थ किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं दरवर्षी एक दिवस उपवास केला जातो. यंदाही आज सर्वजण एक दिवस उपवास करणार आहेत. उपवासाचे हे सहावे वर्ष आहे. तसेच आज आंबाजोगाईत किसानपुत्रांचा मेळावा देखील होणार आहे.

दरम्यान, दरवर्षी किसानपुत्र आंदोलनाला प्रतिसाद वाढत आहे. यंदा प्रचंड संख्येने लोक उपवास करणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातील 48 किसान पुत्रांनी पानगाव ते अंबाजोगाई अशी सलग तीन दिवस शेतकरी संहवेदना पदयात्रा काढली आहे. गेली दोन वर्षे आपण सतत कोरोनाचा प्रादुर्भावाखाली वावरत असल्यामुळं कोणतेही जाहीर कार्यक्रम आपल्याला घेता आले नाहीत. तरीही वैयक्तिक उपवास करुन देश विदेशातील हजारो किसान पुत्रांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याची माहिती किसानपुत्र आंदोलनचे अमर हबीब यांनी दिली.

यावर्षी कोरोनाचे सावट संपले असल्यामुळं आपल्याला जाहीर कार्यक्रम घेता येत आहे. आंबाजोगाईत या पदयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यभरातून आलेल्या किसानपुत्रांचा मेळावा नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात अमर हबीब, राजीव बसरगेकर, कॅप्टन मोहन जोशी, सुभाष कछवे हे मार्गदर्शन करणार आहेत.

या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासोबतच तुमच्यावर आणखीन एक जबाबदारी वाढली आहे. ती म्हणजे उपवासाबाबत सोशल मीडियाचा सशक्त वापर करण्याची. तुम्ही उपवास करताना आपल्या घरावर किंवा जिथे कराल तिथे ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग 19 मार्च’ असे फलक लावा. घरी सर्व कुटुंब उपवास करणार असेल तर या फलकासोबत सर्वांचा फोटो घेऊन तो सोशल मीडियावर (फेसबुक, व्हाट्स अँप, ट्विटर इ.) टाका. जमले तर, मी अन्नदात्यासाठी अन्नत्याग का करीत आहे हे सांगणारा व्हिडीओ करा. तो ही शेअर करा असे सांगण्यात आले आहे.

वैयक्तिक उपवासाची तुमची पोस्ट तर टाकाच, पण इतरांचीही टाका. जे जे तुमच्या माहितीतील उपवास करतील, त्यांची पोस्ट तुम्ही टाका. एक वाक्याचा व्हिडीओ अथवा एक वाक्याची पोस्ट टाकली तरी चालेल. 19 मार्च रोजी पुर्ण सोशल मीडिया केवळ अन्नत्याग आंदोलनाने व्यापला पाहिजे असा आपण प्रयत्न करु. या प्रयत्नात सर्वात अधिक सहभाग तुमचा असावा ही अपेक्षा असल्याचे आंदोलनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 19 मार्चच्या उपवासाने शेतकरी स्वातंत्र्याच्या दिशेने आपले एक पाऊल पुढे पडणार आहे. ते पाऊल दमदार पद्धतीनं पडावे यासाठी आपण सगळे प्रयत्न करु असे अमर हबीब म्हणाले.

19 मार्च 1986 ला साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबानं आत्महत्या केली होती. वीज बिल भरले नाही म्हणून त्यांची वीज कट करण्यात आली होती. ते वीज बिल भरु शकले नाहीत. जमीन विकायला काढली तर ग्राहक नाही. अशा परिस्थितीत साहेबराव यांना आत्महत्या करावी लागली. या घटनेच्या स्मृतीपित्यर्थ 2017 पासून किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने दरवर्षी 19 मार्चला ‘अन्नत्याग आंदोलन’ केलं जातं. या आंदोलनात महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील व विदेशात गेलेले किसानपुत्र देखील सहभागी होतात. लाखाहून अधिक लोक 19 मार्चला उपवास करतात. 2017 ला साहेबराव करपे यांचे गाव चील गव्हाणला भेट देऊन महागाव येथे उपोषण केल्याची माहिती अमर हबीब यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here