भाजपची ‘बी टीम’ असल्याच्या आरोपानंतर, एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलिल यांनी महाविकास आघाडीत येऊ शकतो, अशी थेट ‘ऑफर’च देऊ केली होती. त्यानंतर विरोधी पक्ष भाजपच्या अनेक नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना, एमआयएमची ‘ऑफर’ थेट धुडकावून लावली. महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार आहे आणि तीन पक्षांचेच सरकार राहील. चौथा आणि पाचवा कोण? यात कुणाला पडण्याची गरज नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष महाराष्ट्रातील पक्ष आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना मानणारे पक्ष आहेत, असे राऊत म्हणाले. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरी पुढे जाऊन गुडघे टेकतात, तो त्यांचा आदर्श आहे. ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाहीत. या सर्व अफवा आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. एमआयएम आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे, ते तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिले आहे. बंगालमध्ये बघितले आहे. त्यामुळे ते आधीच भारतीय जनता पक्षासोबत काम करत आहेत, त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
एमआयएम भाजपची ‘बी टीम’
एमआयएम हे भाजपची बी टीमच आहे. उत्तर प्रदेशात हे स्पष्ट झालंय. जर त्यांना भाजपचा पराभव उत्तर प्रदेशात करायचा होता, तर त्यांनी खूप काळजीपूर्वक पावले टाकायला हवी होती. औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होणारे, मग ते कुणीही असतील. ते महाराष्ट्राचे, शिवसेनेचे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाहीत. ज्यांच्यासोबत छुपी होऊ शकत नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
रावसाहेब दानवेंना कडक उत्तर
भाजप आणि संजय राऊत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ‘सामना’ सुरू आहे. ५० आमदार संपर्कात असल्याचे दानवे म्हणाले होते. त्याबाबतही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. दानवे हे माझे चांगले मित्र आहेत. ते दिल्लीत माझ्या बाजूलाच राहतात. धुळवडीत ते काय बोलले, ते २५ बोलले असतील कदाचित. त्यांना १२५ बोलायचे असेल. त्यांना दुसऱ्या दिवसाचे काही आठवत नसेल, असे ते म्हणाले. दानवे चुकून काही बोलले असतील. असे असेल तर, थांबले कशासाठी? कुणाची वाट बघतात? फुसकुल्या कुणासाठी सोडताय, उद्या मी म्हटलं तर, आमच्याही संपर्कात ५० आमदार आहेत, असेही राऊत म्हणाले.