द कश्मीर फाइल्स हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या काही आमदारांकडून करण्यात आली. मात्र, त्याबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याच्या मागणीवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यापूर्वी संजय राऊत यांनीही भाजपवर टीका केली होती. ठाकरे हा सिनेमा देखील चांगला होता. तो टॅक्स फ्री करावा, अशी मागणी आम्ही कधी केली नाही, असे राऊत म्हणाले होते. राऊत यांच्या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर दिले होते. द कश्मीर फाइल्स चित्रपटाला लोक डोक्यावर घेत आहेत. तुमच्या पोटात का दुखतंय? असं भाजपनं म्हटलं होतं.
‘भाजपचे कार्यकर्ते पुरातत्व खात्यातील शास्त्रज्ञांसारखे’
‘भूतकाळ’ खोदण्यासाठी भाजप कार्यकर्ते पुरातत्व खात्यातील शास्त्रज्ञांसारखे कठोर परिश्रम करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजप अनेक जुनी प्रकरणे उकरून काढून देशातील वातावरण कलुषित करण्याचे काम करत आहे. आताच ‘काश्मीर फाईल्स’ सिनेमावरून जोरदार राजकारण भाजपकडून केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, भाजप सध्या पुरातत्व विभागासारखे वाटू लागले आहे. पुरातत्व विभाग ज्याप्रमाणे खोदकाम करून अनेक जुन्या गोष्टी काढतात, तशा पद्धतीने भाजप कामाला लागले असल्याचा हल्लाबोल त्यांनी ट्विटद्वारे केला आहे.