अहमदनगर: नगर-पाथर्डी मार्गावरील जामिया इस्लामिया इशातुलउलूम अक्कलकुवा संचालित जामिया मोहम्मदिया मदरसाने (बाराबाबळी, ता. नगर) करोना विषाणूच्या लढ्यात आपले योगदान देण्यासाठी मदरसा इमारत विलगीकरण कक्षासाठी (आयसोलेशन) देऊ केली आहे.

मदरसाच्या ट्रस्टींनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील आपत्ती व्यवस्थापन केंद्रात निवासी उपजिल्हाधिकारी यांना सदरील इमारत ताब्यात घेऊन विलगीकरण कक्ष बनविण्यासाठी अधिकृत परवानगीचे पत्र दिले. यावेळी मदरसाचे व्यवस्थापक सय्यद सादिक गफ्फार, विश्वस्त मतीन सय्यद, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, आसिर पठाण उपस्थित होते.

जेवणाची व्यवस्थाही करणार

देशासह महाराष्ट्रात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जामिया मोहम्मदिया मदरसाच्या विश्वास्तांनी एकमताने सदर मदरसाची इमारत प्रशासनाला विलगीकरण कक्षासाठी देण्याचा निर्णय घेतला. या मदरसामध्ये मुस्लिम समाजातील मुले धार्मिक शिक्षण घेत असतात. मुलांना सुट्टी असल्याने सदर इमारत मोकळी असून, प्रशासनाला ही इमारत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच येथे विलगीकरण कक्षात येणाऱ्या नागरिकांसाठी जेवणाची सोय देखील करुन देण्याची तयारी मदरसाने दर्शवली आहे. करोना विरोधात चालू असलेल्या संघर्षात देशाबरोबर उभे राहून बाराबाबळीच्या मदरसाने या संघर्षाला पाठबळ दिले आहे.

भव्य आणि प्रशस्त वास्तू
नगर शहरालगत नगर-पाथर्डी रोडवर असलेला बाराबाभळीचा मदरसा प्रशस्त व भव्य असून, येथे मोठ्या संख्येने रूम्स व वीज, पाण्याची सोय आहे. याचा प्रशासनाला उपयोग होणार असल्याची भावना व्यवस्थापक सय्यद सादिक गफ्फार यांनी व्यक्त केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here