साजिद नाडियादवालाचा चित्रपट म्हणजे डोक्याला फार त्रास नसतो. दोन-अडीच तास अॅक्शन आणि कॉमेडीचा ‘तडका’ मारून एक बऱ्यापैकी चित्रपट तो देत असतो. काही चित्रपट फसतातही; मात्र त्याची जातकुळी ठरलेली असते. अक्षयकुमारला खलनायक दाखविणारा ‘बच्चन पांडे’ही असाच एक एंटरटेनर आहे. ‘जिगरथंडा’ नावाच्या तमीळ चित्रपटाचा रिमेक असणारा (हा चित्रपटही एका कोरियन चित्रपटाचा रिमेकच) बच्चन पांडेमध्ये अॅक्शन-कॉमेडी-थ्रिलर असं सारं काही ठासून भरलं आहे. मध्यंतरानंतर शेवटाकडे जाताना होणारा गोंधळ आणि गुंडाळलेला शेवट टाळता आला असता, तर चित्रपट अधिक मनोरंजक झाला असता. दुर्दैवानं तसं होत नाही; तरीही चित्रपट बऱ्यापैकी टाइमपास करतो.

उत्तरेत स्वतःचं साम्राज्य असणाऱ्या एका बड्या गँगस्टरची ही गोष्ट. किडा-मुंग्यांसारखं माणसांना मारणाऱ्या, स्वतःची दहशत पसरविण्यात यशस्वी ठरलेल्या, पोलिस-राजकारण्यांनाही खिशात घातलेला बच्चन पांडे (अक्षयकुमार) नायक आहे. सहदिग्दर्शक म्हणून करिअरमध्ये झगडत असलेल्या मायराला (कृती सेनन) यशस्वी दिग्दर्शक व्हायचं आहे; मात्र तिला हवा तसा ‘ब्रेक’ मिळत नाही. देशातल्या विविध गँगस्टरवर रीसर्च केल्यानंतर अखेर या बड्या गँगस्टरवरच चित्रपट करण्याचा ती निर्णय ती घेते आणि मित्र विशूसोबत (अर्शद वारसी) बच्चनच्या साम्राज्यात दाखल होते. तिथं तिची भेट बच्चनच्या बफरियाचाचा (संजय मिश्रा), पेंड्युलम (अभिमन्यू सिंह) अशा अत्रंगी लोकांशी होते. यूपीतील गँगवॉरमध्ये एकमेकांच्या जीवावर उठलेल्या या माणसांना भेटून बच्चन पांडेचं आयुष्य नक्की काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू होतो. सुरुवातीला मीडिया किंवा पोलिस यांचीच ही खेळी असल्याचं मानून बच्चन पांडे मायरा आणि विशूच्या जीवावर उठतो. नंतर आपल्यावर चित्रपट निघणार या कल्पनेनं तो दोघांना साह्य करतो. दुसरा कुणी अभिनय करण्यापेक्षा स्वतःच चित्रपटाचा नायक होतो. अभिनय शिकवण्यासाठी भावेश भोपलो (पंकज त्रिपाठी) याची नियुक्ती होते आणि मग प्रत्यक्ष शूटिंग सुरू होतं. या दरम्यान पुढं काय घडतं, कोणत्या अडचणींनंतर चित्रपट पूर्ण होतो, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर बच्चन पांडेला तो आवडतो का, स्वतःबद्दल भीती पसरवण्यासाठी चित्रपटास तयार झालेल्या बच्चनचा हेतू साध्य होतो का, या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात मिळतात.

चित्रपटाची कथा निश्चित वेगळी आहे, त्या कथेत अनेक वळणं आहेत; त्यामुळे मध्यंतरापर्यंत चित्रपट रंगतो. शेवटाकडे जाताना मात्र गडबड होते. एका चांगल्या कथेचा शेवट करताना ती गोष्ट गुंडाळण्याकडे लेखकाचा कल आहे की काय, असं वाटू लागतं. कथेतल्या छोट्या गमतीजमती, बच्चनचा विक्षिप्तपणा, अर्शद वारसीचे नेहमीप्रमाणे येणारे ‘कॉमेडी पंच’ या जमेच्या बाजू. चित्रपटाची मांडणीही साउथ स्टाइलची. ‘दे मार’ अॅक्शन, हातोड्यानं डोकी फोडणं, विक्षिप्त हावभाव, एक डोळा नसल्यामुळे नायकाला दगडाचा डोळा असणं, अंगभर सोन्याच्या दागिन्यांसह हातात शस्त्रं घेऊन वावरणं, गंमत म्हणून बंदुकीच्या गोळ्या हवेत उडवणं, कळकट-मळकट ‘भाई लोग’ असले सारे प्रकार दिसतात. मग वरवर व्हिलन दिसणारा बच्चन मनानं कसा हळवा आहे, त्याचा भूतकाळ कसा कारुण्यानं भरलेला आहे, आईच्या प्रेमाला तो कसा भुकेला आहे, हेही दाखवलं जातं.

थोडक्यात, अॅक्शन, कॉमेडी, मेलोड्रामा, लव्हस्टोरी असं सारं काही एकत्र करून ही भेळ तुमच्यापुढं येते. दिवसाढवळ्या सहज लोकांचे मुडदे पाडणाऱ्या बच्चन पांडेला पोलिस काहीच का करत नाहीत, त्याच्यावर राजकीय वरहस्त असतो; पण मग पुढं त्याचं काय होतं? राजरोसपणे स्वतःचं साम्राज्य उभं करताना त्याचा गॉडफादर कोण आहे? बच्चन पांडेचा इतिहास नक्की काय आहे? वगैरे प्रश्न विचारायचे नसतात. म्हणजे तसे प्रश्न न विचारण्यातच शहाणपण असतं. फक्त पडद्यावरचं एन्जॉय करत राहायचं. चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्तम आहे. गाणी लक्षात राहणारी नाहीत. सर्वच कलाकारांचे ‘परफॉर्मन्स’ जबरदस्त आहेत. अक्षयकुमारला ‘लार्जर दॅन लाइफ’ साकारण्यात आलं आहे. अर्शदची भूमिका थोडी विस्तृत हवी होती. कृती सेननही लक्षात राहते. पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा यांचं काम नेहमीप्रमाणे उत्तम. छोट्याशा भूमिकेत मोहन आगाशे लक्षात राहतात. हा बऱ्यापैकी टाइमपास करणारा चित्रपट आहे. फार विचार न करता चित्रपट नक्कीच पाहू शकतो.

बच्चन पांडे
निर्माता : साजिद नाडियादवाला

दिग्दर्शक : फरहाद सामजी

लेखन : साजिद नाडियादवाला, फरहाद सामजी, तुषार हिरानंदानी, स्पर्श खेतरपाल

संगीत : अमाल मलिक, बी. प्राक, जानी

कलाकार : अक्षयकुमार, कृती सेनन, जॅकलीन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, मोहन आगाशे

दर्जा : तीन स्टार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here