नागपूर: सतरंजीपूरा येथील बडी मस्जीद परिसरातील एका ६५ वर्षीय नागरिकाचा करोनाची बाधा झाल्याने रविवारी रात्री ११ च्या सुमारास इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या घशातील स्त्रावाचा अहवाल सोमवारी सकारात्मक आल्याने यावर अधिकृत शिक्कामोर्बत झाले. त्यामुळे नागपुरातील हा करोनाचा पहिला बळी ठरला आहे. यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे या करोनाबाधिताला कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे हा समुदाय प्रादुर्भावाचा पहिला बळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सतरंजीपूरा येथील बडी मस्जीद परिसरातील ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला नातेवाईकांनी शनिवारी रात्री इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दाखल केले होते. नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात आणल्यानंतर, त्याला जुलाबाचा त्रास होत असल्याचे सांगत दाखल करून घेण्यास दबाव आणला होता. मात्र त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे पाहून ही करोनासदृश्य आजाराची प्राथमिक लक्षणे असल्याने रुग्णालयाने त्याला तातडीने करोना वॉर्डात दाखल केले होते. याच दरम्यान उपचार सुरू असताना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याचे निधन झाले.

करोनासदृश्य आजाराचा संशय असल्याने तातडीने त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यानंतर मृतदेह मेयोतील शवागारात ठेवण्यात आला. त्याच्या घशातील स्रावाची सोमवारी प्राधान्यक्रमाने तपासणी करण्यात आली. त्यात त्याच्या नमुन्यात करोना विषाणूचा अंश आढळला.

दिवसभरात नातेवाईक नॉट रिचेबल

या रुग्णाचा अहवाल सकारात्मक आल्याने दुपारपासून मेयो प्रशासन त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधत आहे. मात्र एकही नातेवाईक त्याचा मृतदेह घेण्यास फिरकलेला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. धक्कादायक बाब म्हणजे या ६५ वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा होण्यासाठी कुठल्याही प्रवासाची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे हा समुदाय प्रादुर्भावाचा पहिला बळी असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे.

करोनाबाधितांचा आकडाही वाढतोय

दुसरीकडे, करोनाबाधितांचा आकडाही वाढत आहे. सोमवारी आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. सकारात्मक आलेला रुग्ण हा मूळचा चंद्रपूरचा राहणारा असला तरी, तो २४ मार्चपासून नागपुरात असल्याने तो कोणाकोणाच्या संपर्कात आला, याचा शोध घेतला जात आहे. करोनाच्या चाचणीत सकारात्मक आलेला हा ३९ वर्षीय तरुण २ फेब्रुवारीला इंडोनेशिया येथे गेला होता. तेथून तो सुरुवातीला नवी दिल्लीत आला. त्यानंतर तो २४ मार्चला नागपुरात दाखल झाला. याच सुमारास राज्यात लॉकडाऊन सुरू झाले होते. त्यामुळे नागपुरात आल्यानंतर तो कोणाकोणाच्या संपर्कात आला हे आता प्रशासन शोधून काढत आहे.
या घडामोडीत त्याला आमदार निवास येथे उभारलेल्या सक्तीच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोणाच्या संपर्कात आल्याने त्याला बाधा झाली, की नवी दिल्ली येथूनच तो करोनाची लागण घेऊन आला याची साखळी प्रशासकीय पातळीवर शोधून काढली जात आहे. सोबतच अहवाल सकारात्मक आल्याने त्याला तातडीने आमदार निवासातून थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here