एमआयएमने राष्ट्रवादीला युतीची ऑफर दिल्याच्या मुद्द्यावरूनही रावसाहेब दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘एमआयएम महाविकास आघाडीसोबत आली काय आणि गेली काय, याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आमचा मुद्दा शिवसेनेपर्यंत आहे. ज्या दिवशी शिवसेनेने भाजपशी दगाफटका केला त्याच दिवशी त्यांनी भगवा सोडून हिरवा पांघरला होता,’ अशा शब्दांत दानवे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
‘महाविकास आघाडीतील आमदार फुटणार’
‘महाविकास आघाडी सरकारमधील काही आमदारांनी आमच्याकडे सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी कधीतरी उफाळून येणार आहे. ते बंड करतीलच, फक्त योग्य वेळ आल्यावर ते सर्वांसमोर येतील,’ असा दावाही रावसाहेब दानवे यांनी केला आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आपले चांगले मित्र आहेत, त्यामुळे आपण त्यांच्यावर टीका टिप्पणी करणार नाही, असं सांगत दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्याविषयी अधिक बोलणं टाळलं आहे.
दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी केलेल्या दाव्याला महाविकास आघाडीतून कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.