Satyajeet Tambe : महाराष्ट्राच्या राजकारणात बापमाणूस म्हणावे असे सध्या एकमेव व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब! अशा माणसाशी नुसते बोलायला मिळणे म्हणजे अहोभाग्य असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केलं. तसेच अशा माणसानं आपला थोडा थोडका नाही, तर तब्बल अडीच तास वेळ आमच्या युवक काँग्रेसच्या नवनियुक्त टीमला दिल्याचे तांबे म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नवनियुक्त टीमने दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. यावर सत्यजीत तांबे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत आमच्या नवीन टीमला एक प्रेरणा मिळाली असल्याचे म्हटले आहे.

नेमकं काय म्हणालेत सत्यजीत तांबे

काल देशाच्या राजधानीत युवक काँग्रेसच्या शिलेदारांनी महाराष्ट्राच्या या सह्याद्रीची अर्थातच आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. ते स्वतः काँग्रेस पक्षाचे नेते नसतानाही युवक काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांसाठी त्यांनी वेळ दिला. सर्वांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत चर्चा करायला मिळणं म्हणजे वैचारिक मेजवानीच! ती संधी आमच्या या नवीन शिलेदारांना मिळाली. पवार साहेब स्वतः देखील एकेकाळी युवक काँग्रेसमध्ये होते. त्या काळातील अनेक अनुभव व प्रसंगांना त्यांनी यावेळी उजाळा दिला. त्यांना राजकीय, सामाजिक विषयांबद्दल सखोल मार्गदर्शन केले. त्यातून नक्कीच आमच्या या नवीन टीमला एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली असल्याचे तांबे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

या सर्वांमध्ये माझ्यासाठी विशेष सुखद अशीही एक गोष्ट घडली. पवार साहेबांनी अचानक माझा उल्लेख केला आणि स्व. राजीवभाऊ सातव यांच्याप्रमाणेच सत्यजीत संघटनेत मोठे काम करत असल्याचे उद्गार त्यांनी काढले. त्यांच्या नजरेत भरेल असं काम मला युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून करता आलं, याचं समाधान असल्याचे सत्यजीत तांबेंनी यावेळी सांगितलं. 

पवार साहेब ज्या पद्धतीने नव्या पिढीला प्रेरीत करतात, ती बाब नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. आमच्या अनेक युवा मित्रांनी मला केलेल्या फोननंतर जाणवले की, युवक काँग्रेसच्या या नव्या टीमला या भेटीतून अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. नेहरु-गांधी यांचा विचार आणि काँग्रेस या देशातून कधीच संपू शकत नाही. तुम्ही सर्व युवकांनी आता काँग्रेसची धुरा हाती घ्या आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागा, असा संदेश देत त्यांनी या युवकांचा आत्मविश्वास वृद्धिंगत केला. ही खरोखर वाखाणण्याजोगी गोष्ट असल्याचे सत्यजीत तांबे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here