दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका खासगी साखर कारखान्याकडे ऊस तोडणी मजूर म्हणून कामावर आलेल्या ७ गुन्हेगारांनीच बोरामणी येथे ९ मार्चच्या मध्यरात्री दरोडा टाकला. या दरोड्यात ७५ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम लुटण्यात आली होती. तसंच या दरोड्यादरम्यान बाबुराव हिरजे या जेष्ठ नागरिकांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे राज्यभरात या गुन्ह्याची चर्चा झाली होती.
पोलीस महासंचालकांसह सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याचा आढावा घेतला होता. मात्र या गुन्ह्यातील आरोपींचा सुगावा लागत नव्हता. कोणताच धागा मिळत नसल्याने सोलापूर ग्रामीण पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. ऊस तोडणीनिमित्ताने एक टोळी गावात आल्याचं समजताच पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला अन् रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा गुन्हा उघडकीस आला.
दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत (१) वैभव उर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा.फकराबाद जि.अहमदनगर), (२) संतोष झोडगे (रा.डोकेवाडी जि. उस्मानाबाद), (३) अजयदेवगण उर्फ देवगण सपा शिंदे, (४) सुनील उर्फ गुल्या सपा शिंदे (रा.शेळगांव जि.उस्मानाबाद), (५) ज्ञानेश्वर लिंगु काळे (रा.पांढरेवाडी जि. उस्मानाबाद) आणि विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी जि. उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आली आहे.