मुंबई: करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू केलेला लॉकडाऊन १५ तारखेनंतर १०० टक्के शिथिल होईल, असे कुणी समजू नये, असं राज्याचे आरोग्यमंत्री यांनी स्पष्ट केलं. लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

देशभरात, तसंच राज्यात लॉकडाऊन लागू केला आहे. या कालावधीत नागरिकांना विनाकारण घराबाहेर जाण्यास मनाई आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. लॉकडाऊनसंदर्भात केंद्र किंवा राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत आज भूमिका स्पष्ट केली आहे. १५ तारखेनंतर लॉकडाऊन हे १०० टक्के शिथिल होईल, असं कुणी समजू नये. अनेक देशांतील परिस्थितीचा अभ्यास करून लॉकडाऊन कसे शिथिल करता येईल यावर अभ्यास सुरू आहे. केंद्र सरकार याबाबत आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे, असंही टोपे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे यावर निर्णय घेतील. राज्यात १० ते १५ एप्रिलपर्यंत असलेल्या परिस्थितीवर लॉकडाऊनची पुढील दिशा अवलंबून असेल, असेही त्यांनी सांगितले.

सव्वा तीन लाख पीपीई किटस्, मास्क, व्हेंटिलेटरची केंद्राकडे मागणी

करोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामुग्री उपलब्ध आहे. मात्र आपत्कालीन स्थिती ओढवल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारकडे सव्वा तीन लाख पीपीई किटस्, नऊ लाख एन ९५ मास्क आणि ९९ लाख ट्रिपल लेअर मास्कची मागणी करण्यात आली आहे. हे साहित्य तातडीने मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितले.

या साहित्याची मागणी केंद्राकडे केली असली, तरी राज्यात या साहित्याची खरेदी करण्याकरिता आवश्यक ती तयारी करावी, असे निर्देशही विभागाचे सचिव आणि आयुक्तांना दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. करोना प्रतिबंधासाठी लागणारे साहित्य राज्यांनी त्यांच्या स्तरावर खरेदी करू नये. केंद्राकडून त्याचा पुरवठा करण्यात येईल, अशा आशयाचे पत्र केंद्राकडून राज्यांना पाठविण्यात आले आहे. सध्या राज्यात शासकीय आरोग्य यंत्रणेकडे ३५ हजार पीपीई किटस्, तीन लाखाच्या आसपास एन ९५ मास्क, २० लाख ट्रीपल लेअर मास्क, १३०० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून केंद्र सरकारकडे यासर्व साहित्यांची मागणी केली आहे. राज्यात याचा तुटवडा जाणवू नये यासाठी या साहित्याची खरेदी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत राज्याच्या आरोग्य सचिवांना निर्देश दिल्याचे आोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here