कोल्हापूर :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Assembly Constituency) काँग्रेसला हिरवा कंदील दाखवल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Shivsena Rajesh Kshirsagar) नाराज होते. दोन दिवस ते नॉट रिचेबल होते. क्षीरसागर आज कोल्हापुरात परतल्यानंतर त्यांनी नाराज शिवसैनिकांची समजूत काढून पक्षप्रमुखांचा आदेश असल्याने महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी शिवसेना काँग्रेसच्या पाठीशी राहणार आहे, अशी घोषणा केली. क्षीरसागर यांच्या घोषणेने महाविकास आघाडीला मोठे बळ मिळणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने पोटनिवडणुकीत ही जागा शिवसेनेला मिळावी, असा आग्रह जिल्ह्यातील नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांकडे धरला होता. मात्र महाविकास आघाडीनुसार ही जागा काँग्रेसकडे असल्याने पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा काँग्रेसला राहील, असं स्पष्ट झालं होते. त्यामुळे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे नॉट रिचेबल होते. ते नाराज असल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली होती. मात्र आज रविवारी महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आघाडीचा मेळावा संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झाला. यावेळी जयश्री जाधव यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना संपर्क नेते अरुण दुधवडकर, शिवसेना खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे उपस्थित होते. माजी आमदार क्षीरसागर या मेळाव्याकडे फिरकलेच नाही.

Kashmir Files: शरद पवारांची भाजपवर खोचक टीका; संपूर्ण इतिहासच सांगितला!

दरम्यान तब्बल दोन दिवसानंतर क्षीरसागर सायंकाळी कोल्हापुरात आले. यावेळी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. क्षीरसागर यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शिवसैनिकांसमोर गेले. यावेळी बोलताना ते म्हणाले, मातोश्री हे आमच्यासाठी मंदिर आहे, शिवसेनाप्रमुखांचा आदेश हा आमच्यासाठी शिरसावंद्य आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेना ही काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी राहील असं त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेची हक्काची जागा काँग्रेसला सोडल्याने शिवसैनिक नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न गेले दोन दिवस मी करत होतो, असं ते म्हणाले.

‘मी नाराज नाही’

‘पक्षप्रमुखांच्या आदेशावर मी नाराज नाही. शिवसेनेने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दोन वेळा आमदार होण्याची संधी दिली. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने मदत केल्याने माझ्याविरोधात काँग्रेसचे चंद्रकांत जाधव विजयी झाले. पण त्यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेने दावा केला होता. मात्र महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा काँग्रेसला मिळाली असल्याने आम्ही काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी राहणार आहोत,’ असं राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here