पुणे : हांडेवाडी येथून बेपत्ता झालेल्या तरूणाचा वायरने गळा आवळून खून करत मृतदेह पुरून टाकल्याचा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण रोहिदास हांडे (वय २०, रा. उरूळी कांचन) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी किरण याच्या पत्नीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण याचा प्रेम विवाह झाला होता. विवाहानंतर तो हांडेवाडी परिसरात पत्नीसोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याचे आई-वडील पुण्यात दुसरीकडे राहतात. किरण हा एका गॅरेजमध्ये काम करत होता. त्याला याच परिसरातील तीन ते चार मित्र आहेत. शुक्रवारी रात्री व शनिवारी दिवसभरात तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात किरण बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत होते. तसंच, किरण याचे नातेवाईक देखील त्याचा शोध घेत होते.

शिवसेनेच्या ‘नॉट रिचेबल’ माजी आमदाराने अखेर सर्वांसमोर जाहीर केली भूमिका

शोध घेताना नातेवाईकांना हांडेवाडी येथील पाटील व्ह्यू सोसायटीच्या मागील बाजूला मोकळ्या मैदानात किरण हा दारू पिण्यास बसला होता, अशी माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी येथे येऊन पाहणी केली असता त्यांना मातीत पुरलेला मृतदेह आढळून आला. त्यांनी ही माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता वायरने गळा आवळून खून केला असल्याचं दिसून आले.

दरम्यान, खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी किरणचा मृतदेह पुरला असण्याची शक्यता आहे. त्याचा खून कोणी व का केला याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी संशयितांकडे चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here