प्राप्तिकर विभागाने रविवारी पुणे आणि ठाण्यात कंपनीच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या. इन्फ्रा.मार्केट कंपनीनं बोगस बिले आणि कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार दाखवले असल्याचे पुरावे प्राप्तिकर विभागाच्या हाती लागले आहेत. जवळपास ४०० कोटींचे हे बेकायदा व्यवहार झाल्याचा अंदाज प्राप्तिकर विभागाने व्यक्त केला आहे. छापेमारी दरम्यान प्राप्तिकर विभागाने एक कोटी रुपये, २२ लाखांचे दागिने जप्त केले आहेत.
बांधकाम साहित्य पुरवण्याचा इन्फ्रा.मार्केटचा व्यवसाय आहे. कंपनीचा देशभरात विस्तार असून ६००० कोटींची उलाढाल आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशात कंपनीचा मोठा व्यवसाय आहे. कंपनीने मागील काही आर्थिक वर्षात बनावट बिलांच्या आधारे बोगस आर्थिक व्यवहार दाखवून करचुकवेगिरी केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला आला. त्यातून छापेमारी करण्यात आली. कंपनीनं माॅरिशसमधून परकी गुंतवणूक देखील प्राप्त केली आहे. हा व्यवहार कसा झाला याचाही तपास प्राप्तिकर विभागाकडून केला जाणार आहे.
इन्फ्रा.मार्केटला शेल कंपन्या (बनावट कंपनी) स्थापन करुन कोट्यावधी रुपयांचे गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनात आले आहे. या बनावट कंपन्यांमधून जवळपास १५०० कोटींचे व्यवहार झाल्याचे बोलले जाते. मागील काही वर्षात कंपन्यांमधील सुशासन आणि शिस्तबद्धतेचे प्रमाण कमी होत चालले आहे. विशेषत: बड्या स्टार्टअप्समधील गैरव्यवहारांनी सुशासनात त्रुटी अधोरेखीत केल्या आहेत.