कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये गुन्ह्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका महिलेचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत टाकल्याची घटना शाहूवाडी तालुक्यातील मानोली येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहूवाडी पोलीसांनी या घटनेची माहिती दिली. मानोली लघुपाटबंधारे तलावाच्या मागील बाजूस नायकाचा सरवा नावाचे जंगल आहे. या जंगलात कचऱ्याच्या पेटीत अनोळखी महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मानोलीचे पोलीस पाटील दत्तात्रय गोमाडे यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी भेट दिली. त्यांनी पत्र्याची पेटी आणि मृतदेहाचे निरीक्षण केले. संबंधित महिलेचा गळा आवळून खून केल्याचा संशय पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी व्यक्त केला. संबंधित महिलेचे वय ३० ते ३५ असावे. रंग गोरा असून अंगावर काळ्या रंगाची अर्धवट साडी होती. इतकंच नाहीतर, सहा दिवसांपूर्वी खून झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.