सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रश्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, आमचे सरकार येण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी पाच वर्षे अर्थमंत्री म्हणून काम केले. पाच वर्षे मी सभागृहात येत होतो. त्यावेळेस सभागृहात तिथीनुसार शिवजंयती साजरी झाली नाही किंवा कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवला गेला नाही, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आताही शिवजयंतीवरून वाद होता कामा नये. उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले होते. दिवंगत नेते रामकृष्ण मोरे मंत्री असताना शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाल्याची नोंद करण्यात आली. तेव्हापासून हीच तारीख प्रमाण मानून या दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. या दिवशी मुख्यमंत्री शिवनेरीवर जातात. ही प्रथा आजही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करते. पण तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची असेल तर तो अधिकार प्रत्येक नेत्याला, आमदाराला आणि खासदाराला आहे. कारण नसताना या मुद्द्यावरून चर्चा होता कामा नये, असे अजित पवार यांनी सांगितले.
शिवजयंतीचं राजकारण करायचं असेल त्यांनी खुशाल करावं: संजय राऊत
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तिथीनुसार येणारी शिवजयंती भव्य स्वरुपात साजरी झाली पाहिजे, असे आदेश मनसैनिकांना दिले होते. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी मनसेला अप्रत्यक्ष टोला लगावला. कोणी काय करायचं हा आपापल्या बुद्धीचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने ज्यांना राजकारण करायचं असेल त्यांनी ते करावं, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Ajit Pawar vs Sudhir Mungantiwar: शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार, विधानसभेत अजितदादा-मुनगंटीवारांमध्ये रंगला वाद