मागील काही दिवसांपासून मोहित कंबोज आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होती. कंबोज यांनी महाविकास आघाडीतील नेते संजय राऊत आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. महाविकास आघाडीवर टीका करणारे कंबोज हे आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने मोहित कंबोज यांना नोटीस बजावली आहे. २३ तारखेला त्यांच्या घराची पाहणी करणार आहेत. त्यांच्या घरात काही बेकायदा बांधकाम झाले आहे का, याची पाहणी पालिका अधिकाऱ्यांचे पथक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
घराची पाहणी करण्याबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावल्यानंतर मोहित कंबोज यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. काहीही केलं तरी, महाविकास आघाडी सरकारसमोर मी झुकणार नाही, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
खोटा गुन्हा दाखल करू शकला नाहीत म्हणून माझ्या घरी मुंबई महापालिकेनं नोटीस पाठवली आहे. कंगना रनौत असो किंवा नारायण राणे…त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकले नाहीत, तर आता घर तोडायचे. काही हरकत नाही. काहीही करा, पण महाविकास आघाडी सरकारसमोर मी झुकणार नाही, असंही कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.