नवी दिल्लीः करोनाचे व्हायरसच्या देशातील रुग्णांची संख्या ४ हजारांवर गेली आहे. तर १०० हून अधिक जणांचा मृ्त्यू झाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाला आहे. १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन आहे. पण लॉकडाऊन कायम ठेवण्याचा इशारा काही राज्यांनी दिला आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लॉकडाऊन दोन आठवडे वाढवण्याचं आवाहन केलं आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा. नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी लॉकडाऊन वाढवणं गरजेचं आहे. १५ एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवावा या बाजूने मी आहे. आर्थिक संकटातून आपण बाहेर येऊ शकतो. पण नागरिकांचे प्राण परत आणता येणार नाही. यामुळे पंतप्रधानांनी लॉकडाऊन वाढवण्याला आपली हरकत नाही, असं के. चंद्रशेखर राव यांनी म्हटलंय.

कोण वाढवणार, कोण हटवणार?

एका बीसीजी रिपोर्टच्या आधारावर तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी लॉकडाऊन वाढवण्याचं आवाहन केलं आहे. या बीसीजी रिपोर्टमध्ये लॉकडाऊन ३ जूनपर्यंत वाढवण्याचा सल्ला दिला आहे. पण तेलंगणने अधिकृतपणे लॉकडाऊन वाढवण्याची कुठलीही घोषणा केलेली नाही. पण पंजाब सरकारही लॉकडाऊन वाढवण्याच्या विचारात आहे, असं सांगण्यात येतंय. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी यावर काहीच स्पष्ट केलेलं नाही. तर महाराष्ट्र आणि आसाम काही दिवसांत निर्णय घेतील, असं सांगण्यात येतंय.

‘उत्तर प्रदेशात लॉकडाऊन कायम राहणार’

करोना व्हायरसाचा एकही रुग्ण आढळून आला तरी राज्यातील लॉकडाऊन हटवणार नाही, असं उत्तर प्रदेशचे गृह सचिव अवनीश अवस्थी यांनी सांगिलंय.

PM मोदींचाही इशारा

दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना पुढील नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊननंतर टप्प्या टप्प्याने सरकारी कार्यालये उघडण्यात येत आहेत. करोनाचे रुग्ण ज्या ठिकाणी अतिशय कमी आहेत तिथे लॉकडाऊन हटवण्याचा विचार सुरू आहे. पण याचवेळी करोनाविरोधातील लढाई दीर्घ काळ चालले, असं पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना पक्षाच्या ४० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सांगितलं.

देशात करोनाचे आतापर्यंत १११ बळी

देशातील करोना रुग्णांची संख्या ही ४२८१ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासांतमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल ७०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील करोनाने मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १११पर्यंत गेली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here