मलंगगड परिसरातील काकडवाल गावातील शिवमंदिर परिसरात जादूटोणा करण्यासाठी तिघे जण आले होते, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. होळीच्या म्हणजेच हुताशनी पौर्णिमेला रात्रीच्या सुमारास काही जण जादूटोणा करत असल्याचा संशय काही ग्रामस्थांना आला. त्यानंतर जादूटोणा करणारे मंदिर परिसरात आल्याची अफवा गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर लगेच ग्रामस्थांनी शिवमंदिर परिसरात धाव घेतली. त्यावेळी तिघे जण तिथे हवन करत असल्याचे दिसले. ग्रामस्थ येताच तीन जणांपैकी दोघे जण पळून गेले. तर एकाला ग्रामस्थांनी पकडले आणि मारहाण केली. ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तेथे उपस्थित ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केली नाही. उलट, त्या संशयित तरूणाला मारहाण केली म्हणून ग्रामस्थांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘तरूण काकडवाल गावातील शिवमंदिरात पूजा करत असताना, त्याला जादूटोणा करत असल्याच्या संशयातून मारहाण करण्यात आली. त्या तरुणाच्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्यांना पोलिसांकडून सक्त ताकीद देण्यात आली आहे,’ अशी माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्रे यांनी दिली.