द काश्मीर फाइल्स सिनेमानं या आठवड्याच्या सुरुवातीला १२.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या आकड्यांमध्ये सांगायचं तर सिनेमानं आतापर्यंत १७९.८५ कोटींची घसघशीत कमाई केली आहे. सिनेमाला जर असाच प्रतिसाद कायम राहिला तर लवकरच हा सिनेमा २०० कोटींच्या क्लबमध्ये जाईल, असा अंदाज निरीक्षक व्यक्त करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून द काश्मीर फाइल्स सिनेमानं लोकप्रियतेचा आणि कमाईचा उच्चांक गाठला आहे. १४ कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमानं आतापर्यंत राधे-श्याम, गंगुबाई काठियावाडी, बच्चन पांडे या सिनेमांना कमाईमध्ये कधीच मागे टाकलं आहे. मौखिक प्रसिद्धीचा सिनेमाला भरपूर फायदा झाला आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ आणि पुण्याचं आहे हे खास कनेक्शन, दिग्दर्शकानेच केला खुलासा

करोनानंतर शिथील झालेल्या निर्बंधानंतर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सिनेमाला कसा प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. परंतु सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून घसघशीत कमाई केली आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात १२ कोटींहून अधिक कमाई करत सूर्यवंशी, ८३ या बॉलिवूड सिनेमांबरोबरच हॉलिवूडच्या स्पायडरमॅनला देखील मागे टाकलं आहे.
द काश्मीर फाइल्स सिनेमानं रविवारी एका दिवसात २६.२० कोटी रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे या सिनेमानं आमिर खानचा दंगल आणि सुपरस्टार प्रभासच्या बाहुबली सिनेमाच्या कमाईचा विक्रमही तोडला आहे.
‘पावनखिंड’ झळकलेला हा अभिनेता आहे तरी कोण? भूमिकेचं झालं कौतुक
काश्मीर खोऱ्यात ९० च्या दशकामध्ये तिथल्या काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचे, त्यांच्यावरील अत्याचाराचं हृदयद्रावक चित्रण सिनेमात करण्यात आलं आहे. हा सिनेमा पाहून अनेक प्रेक्षकांना त्यांच्या भावना आवरता आलेल्या नाहीत. सिनेमामुळे बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत. काहींनी सिनेमाचं समर्थन केलं आहे तर काहींनी सिनेमावर टीका करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा सिनेमा आता इतर भाषांमध्ये डब होण्याची तयारी केली जात आहे. हा सिनेमा आता तेलुगू, कन्नड, तामिळ, मल्याळम भाषांत डब केला जाणार आहे. यामुळे निर्मात्यांना हा सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवायचा आहे. या सिनेमामध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.