म. टा. वृत्तसेवा, कल्याण

कल्याण-डोंबिवली शहरातील करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी नागरिकांकडून नियमांची पायमल्ली सुरूच आहे. यामुळे शहरातील करोनाची लागण तिसऱ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मात्र तरीही नागरिक सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळेच केडीएमसी प्रशासनाकडून अनेक निर्बंध घातले जात आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता मेडिकल आणि क्लिनिक वगळता अन्य जीवनावश्यक वस्तूदेखील १२ तासच उपलब्ध होणार आहेत. सकाळी पाच ते संध्याकाळी पाच या वेळेतच नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येणार असून संध्याकाळी पाचनंतर या सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले असले तरी सर्वच छोट्या-मोठ्या दुकानांत नागरिक खरेदीसाठी रांगा लावत गर्दी करत आहेत. यामुळे सुरक्षित अंतर ठेवण्याच्या आवाहनाचा फज्जा उडत आहे. सकाळी भाजीखरेदीसाठी नागरिक गर्दी करतात.

यामुळेच मंगळवारपासून सकाळी पाच ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच बेकरी, डेअरी, किराणा दुकाने, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवली जातील तर संध्याकाळी पाचनंतर ही सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. केवळ मेडिकल आणि क्लिनिकच पूर्णवेळ सुरू ठेवता येणार आहेत. तसेच, या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आदेशात नमूद केले आहे.

बाजार समितीतील गाळे दिवसाआड बंद

कल्याण : जीवनावश्यक बाबींमध्ये समाविष्ट असल्याने बाजार समित्या बंद राहणार नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र तरीही भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होत आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला बाजार विभागातील ‘जे’ टाइप इमारतीमध्ये प्रकर्षाने गर्दी जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समिती ‘जे’ टाइप इमारतीमधील व्यवहारासंदर्भात काही गाळ्यांवरील व्यवहार दिवसाआड बंद करण्याचा निर्णय कल्याण कृषी उत्पन्न बाजारसमितीने घेतला आहे. या निर्णयानुसार दिलेल्या तारखांना त्यासमोर दर्शविलेल्या सर्व गाळेधारकांनी व्यवहार बंद ठेवावयाचा आहे. तसेच, नमूद तारखांना व्यवहार सुरू आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बाजार समिती प्रशासनाने कळविले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here