परभणी : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर राज्य शासनाने आणखी एक जबाबदारी दिली असून त्यांना बीड जिल्ह्यासह परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्त करण्यात आले आहे. या बाबतचा शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे. आपल्यावर सोपवलेल्या या जबाबदारीच्या माध्यमातून बीडसह परभणी जिल्ह्यातही सकारात्मक विकास घडवून आणणारी कामे करून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू व आपल्यावर पक्षश्रेष्ठींसह सर्वांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, असे मत मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
परभणीकरांकडून स्वागत
दरम्यान, धनंजय मुंडे यांची परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर परभणीतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आदींनी आनंद व्यक्त करत धनंजय मुंडें यांचे स्वागत केले आहे. आमदार बाबाजाणी दुर्रानी, माजी विजय भांबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर आदींनी मंत्री मुंडेंची भेट घेऊन सत्कार केला. तसेच जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत एकत्र येऊन काम करण्याचे आश्वासन दिले आहे.