सिंधुदुर्ग : राज्यात वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे आधीच बळीराजा वैतागला आहे. अशात गेल्या आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा कमी होत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र आणि भोवतालच्या प्रदेशात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे मंगळवारी राज्यभर ढगाळ वातावरण होते. याचा परिणाम आजही अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, बुधवारी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह सातारा आणि सांगली इथं गुरुवारी पावसाच्या हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली इथं हवामान खात्याकडून शुक्रवारीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खरंतर, चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आजही सकाळपासूनच अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. आज मुंबईसह कोकणपट्ट्यातील भागांतही ढगाळ वातावरण आहे.