मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आक्रमक झाले आहेत. सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर घणाघाती आरोप केले आहेत. ईडीने काल जो व्यवहार समोर आणला आहे त्यानुसार ३० कोटी रुपयांचं मनी लॉन्डरिंग झालं आहे. सगळी प्रकरणे बाहेर आली तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार आहे, असा हल्लाबोल किरीट सोमय्यांनी केला आहे. तसंच सोमय्या यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर आरोप करताना काही गंभीर प्रश्नही विचारले आहेत. (Kirit Somaiya Targets Uddhav Thackeray)

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या डर्टी डझनची यादी मी जाहीर केली होती. पण मी त्यामध्ये ठाकरे कुटुंबाचं नाव घेतलं नव्हतं. मात्र आता श्रीधर पाटणकर यांचे कारनामे समोर आले असून या प्रकरणात मागील दीड वर्षांपासून मी ईडीसोबत पाठपुरावा करत आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे असलेल्या श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असून त्यांच्यावर मुंबई महापालिकेच्या अभियंत्याची कृपा आहे,’ असं किरीट सोमय्या म्हणाले.

Video : पाटणकर मामांवर कारवाई, भाचा आदित्य ठाकरे एकच वाक्य बोलत होते…

ठाकरे कुटुंबाला कोणते प्रश्न विचारले?

किरीट सोमय्या यांनी आपल्या संपूर्ण पत्रकार परिषद ठाकरे कुटुंबाविरोधात आरोपांची राळ उठवली. ठाकरे कुटुंबाचं हे पहिलंच मनी लॉन्डरिंग आहे का? त्यांनी याआधी कधी मनी लॉन्डरिंग केलं आहे का आणि श्रीधर पाटणकरने मनी लॉन्डरिंग करून ते पैसे ठाकरे कुटुंबाला दिले का? या प्रश्नांची उत्तरे स्वत: उद्धव ठाकरे यांनीच द्यावीत, असं म्हणत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

‘शिवसेनेच्या ६ नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार’

‘उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यामध्ये जमिनीचा व्यवहार आहे, हे मी आधीपासून सांगत होतो. मात्र तेव्हा माफीया सेनेचे लोक माझ्यावर हल्ला करत होते. हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीसोबत उद्धव ठाकरेंचे संबंध काय आहेत, हे त्यांनीच सांगावं म्हणजे ईडीला आणि इतर तपास यंत्रणांना जास्त मेहनत करावी लागणार नाही. उद्धव ठाकरेंनी १९ बंगले लपवण्याचा खूप प्रयत्न केला. ठाकरे कुटुंबाने उभी केलेली एक कंपनी नंदकिशोर चतुर्वेदींना कशी गेली? गेल्या २ वर्षांपासून पोलिसांचा माफियांप्रमाणे वापर करून पैसे जमा करण्यात येत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या ६ नेत्यांचे घोटाळे मी लवकरच बाहेर काढणार आहे,’ असाही दावा सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी केलेल्या या घणाघाती आरोपांनंतर शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांतील संघर्ष आणखीनच वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात या आरोपांवर शिवसेनेकडून कसा पलटवार केला जातो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here