Pune News Today Live Power Supply To 60000 Consumers In Cities Including Bhosari Has Been Cut Off | पुणेकरांसाठी मोठी बातमी, भोसरीसह ‘या’ शहरांतील ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद
पुणे : महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी (दि. २३) सकाळी ६ वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे भोसरी व आकुर्डीमधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या बंद आहे. विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारव्यवस्थापन शक्य होत नसल्याने पर्यायी वीजपुरवठ्याची सोयदेखील उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र, महापारेषणकडून या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड शोधण्याचे काम जलदगतीने सुरु असून त्याबाबत दुपारपर्यंत स्थिती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, सध्या पर्यायी किंवा इतर तांत्रिक उपाययोजनेतून वीजपुरवठा कमीत कमी कालावधीसाठी बंद राहील यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारव्यवस्थापनात अडचणी येत आहे. त्यामुळे भोसरी विभागातील इतर ग्राहकांनी विजेचा कमीत कमी वापर करावा अशी विनंती करण्यात येत आहे. पुणे हादरलं! कुख्यात गुंडांच्या मुलाकडून भयंकर गुन्हा, विद्यार्थिनीला वेगवेगळ्या लॉजवर नेलं आणि… मिळालेल्या माहितीनुसार, भोसरीमधील गवळी माथा इथे महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रामध्ये १०० एमव्हीए क्षमतेचे दोन व ७५ एमव्हीए क्षमतेचा एक असे एकूण तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यातील १०० एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरद्वारे महावितरणच्या एकूण २६ वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र यातील १०० एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या एकूण १० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला.
परिणामी प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील ४५०० औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे. महावितरणकडून याबाबत संबंधित सर्व ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे.