मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून सुरू असलेला वाद आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही पोहोचला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी किती काळ बोलायचं, या मुद्द्यावरून चर्चा सुरू असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे ‘द काश्मीर फाईल्स’वरून आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. (Jayant Patil Vs Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या कामकाजासंदर्भात बोलत असताना समोरील बाजूला बसलेल्या एका मंत्र्याने त्यांना ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमावरून डिवचलं. त्यावर फडणवीस यांनी आक्रमक उत्तर देत म्हटलं की, होय आम्ही काल ठरवलं होतं आणि आम्ही काश्मीर फाईल्स सिनेमा पाहायला गेलो होतो. तुम्हाला त्याच्यावर काही आक्षेप आहे का? तुम्हाला काही अडचण असेल तर बाहेर मांडा.

चिंता वाढवणारी बातमी; ओमिक्रॉन विषाणूबाबत संशोधनातून नवी माहिती समोर

फडणवीस यांच्या या टीकेनंतर सत्ताधारी पक्षाकडून जयंत पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर देत टोलेबाजी केली. ‘काश्मीर फाईल्स हा इंटरव्हलनंतर फार बोरिंग सिनेमा आहे, तो काही इंटरेस्टिंग सिनेमा नाही, बघा तुम्हाला माहीतच आहे. काश्मीर फाईल्सचं एवढं कौतुक असेल तर निर्मात्यांना १७ कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या सिनेमातून कमावलेले १५० कोटी रुपये काश्मिरी पंडितांची घरे बांधण्यासाठी दान करायला सांगा,’ असं खोचक आवाहन जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना केलं आहे.

संयमी स्वभावासाठी ओळखले जाणारे जयंत पाटील विधानसभेत भडकले!

मंत्री जयंत पाटील हे विधानसभेतील आपल्या शांत, संयमी आणि तिरकस भाषणासाठी ओळखले जातात. मात्र आज जयंत पाटील हे विधानसभेत भडकल्याचं पाहायला मिळालं. ‘काश्मीर फाईल्स’ सिनेमावरून दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर विधानसभेत पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांना बोलण्यासाठी किती वेळ मिळायला हवा, या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. मात्र या प्रश्नाबाबत जयंत पाटील हे बोलत असताना भाजपच्या काही सदस्यांनी खाली बसून शेरेबाजी सुरू केली. यामुळे संतप्त झालेल्या जयंत पाटील यांनी भाजपवर चांगलंच आक्रमण केलं.

‘प्रत्येकवेळी खाली बसून बोललं पाहिजे ही काय पद्धत आहे? तुमचे नेते उभे राहिल्यानंतर आम्ही बोलतो का कधी? विरोधी पक्षनेत्यांनी खाली बसून बोलणाऱ्यांना समज द्यावी, त्यांना प्रोत्साहन देऊ नका. नाहीतर मग प्रत्येकाच्या भाषणात अडथळे निर्माण केले जातील. त्यामुळे खाली बसून बोलण्याची पद्धत आधी बंद करा,’ अशा शब्दांत जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना खडसावलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here