मंगळवारी नेहमीप्रमाणे रियाज घरातील कामकाजामध्ये कुटुंबियांना मदत करत होता. यावेळी घराच्या समोरील रस्त्यावरून एक वृद्ध दाम्पत्य टीव्हीएस लुना या दुचाकीवरून ओरडत येत असल्याचं त्याला दिसले. गाडीचे ब्रेक लागत नाहीत. आम्हाला वाचवा, अशी आर्त विनवणी ते जोडपे करत असल्याचे रियाजच्या निदर्शनास आले.
वेगात असणारी दुचाकी थांबवायची कशी? असा विचार सुरुवातीला रियाजच्या मनात आला. मात्र, दुचाकीच्या मागे पळत रियाज याने दुचाकीचे कॅरेज घट्ट धरले. दुचाकी थांबवली. रियाजच्या या प्रसंगावधानामुळे या वृद्ध दाम्पत्य सुखरूप बचावले. जर ही दुचाकी थांबली नसती तर समोरील इंदापूर- बारामती राज्य महामार्गावर गेली असती. मात्र, रियाजने दाखवलेल्या धाडसामुळे पुढील अनर्थ टळला.
या प्रसंगातून बचावलेल्या वृद्ध दाम्पत्याने देखील ‘बरे झाले लेकरा तू होतास म्हणून आम्ही वाचलो’ अशा शब्दात रियाजचे आभार मानले. हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून रियाजच्या या धाडसाचे व प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. इतकंच नाहीतर ग्रामस्थांच्या वतीने रियाजचा सत्कार करण्यात आला.