मुंबई: ‘सध्याच्या संकटाच्या परिस्थितीत लोकांनी शिस्त पाळायलाच हवी. फक्त `मरकज’वालेच नियम मोडतात असं नाही. मरकजवाल्यांवर करोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

देशभरात करोनानं धुमाकूळ घातला असून रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, लोक शिस्त पाळताना दिसत नाहीत. यांनी केलेल्या आवाहनाचा वेगळाच अर्थ काढून रविवारी लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडले. मेणबत्त्या, टॉर्च घेऊन लोक रस्त्यावर उतरले होते. या संपूर्ण घडामोडींवर ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. ‘पंतप्रधानांच्या भावना लोकांपर्यंत नीट पोहोचत नाहीत. काहीतरी गडबड निश्चित आहे. अन्यथा रविवारी देशात अनेक ठिकाणी जे दिव्य प्रताप झाले ते घडले नसते, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंसारखाच सेनापती हवा!

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकांशी सहज सरळ पद्धतीने, कोणताही गोंधळ उडणार नाही अशा रीतीने संवाद साधत आहेत. लोकांना मदत कशी करता येईल यावर भर देत आहेत. वैद्यकीय सुविधा कशा वाढवता येतील यावर लक्ष ठेवून आहेत. जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. करोनाशी जे युद्ध सुरू आहे त्या युद्धात लढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासारख्याच सेनापतीची गरज आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

अग्रलेखातील ठळक मुद्दे:

>> करोनामुळे आज हजारो रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. काहींनी त्यांचे प्राणही गमावले आहेत. अशा वेळी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता लोक रस्त्यांवर घोळक्याने फिरतात, घोषणा देतात, फटाके फोडतात, आतिषबाजी करतात हा सगळाच प्रकार हास्यास्पद म्हणावा लागेल.

>> पंतप्रधान नक्की काय सांगत आहेत ते समजून न घेता जनता अशी मनमानी करते. त्यास युद्ध म्हणता येणार नाही. हा सरळ सरळ आत्मघात आहे.

>> रविवारी रात्री नऊ वाजता पंतप्रधान मोदी यांच्याच आदेशाने लोक रस्त्यावर उतरले. त्यामुळे कायदा व नियम मोडून पडले. पंतप्रधानांना जे सांगायचे आहे त्याचा विपरीत अर्थ काढून लोक आपापली सोय पाहत आहेत किंवा पंतप्रधानांचा लोकांशी नीट संवाद होत नाही. किंवा पंतप्रधानांनाच हे ‘उत्सवी’ वातावरण हवं आहे, असाही याचा अर्थ असू शकतो.

>> चीनला शिव्या देणे, त्याविरुद्ध संताप व्यक्त करणे समजण्यासारखे आहे. पण करोनाशी लढताना चीनच्या जनतेने शिस्त पाळली. `लॉक डाऊन’च्या काळात तेथील जनता घरीच बसून होती, हेही लक्षात घ्यायला हवं.

>> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सध्या चीनबाबत सगळ्यात जास्त शिवराळ भाषा वापरत आहेत, पण चीनला शिव्या देऊन त्यांना करोनावर मात करता आली नाही. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींकडे करोनाशी लढण्यासाठी औषधे मागितली आहेत. ट्रम्प यांनी हिंदुस्थानकडे थाळ्या, घंटा, शंख, मेणबत्या किंवा पणत्या मागितल्या नाहीत हे आपल्याकडील उत्साही व उत्सवी प्रजेने समजून घेतले पाहिजे.

>> उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षांनी हवेत गोळीबार केला. या वीरांगनेस तत्काळ चीनच्या सीमेवर पाठवून तिचे शौर्य दाखवण्याची संधी तिला मिळायला हवी.

>> महाराष्ट्रातील वर्धा येथील भाजप आमदार दादाराव केचे यांनीही `लॉक डाऊन’ला धाब्यावर बसवून आपला वाढदिवस साजरा केला. त्यासाठी त्यांच्या निवासस्थानी २०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. त्यातून `सोशल डिस्टन्सिंग’चीही पुरती वाट लागली. ज्यांनी गर्दी जमणार नाही याची फिकीर करायची तेच बेफिकीरपणे वागत असतील तर कसे व्हायचे?

>> पानिपतच्या युद्धात आपला पराभव झाला होता तो अफवा, नियोजनशून्यता यामुळे. सदाशिवराव भाऊंचे रणंगणावर नेमके काय झाले हा संभ्रम कायम राहिला. करोना युद्धाची स्थिती ‘पानिपत’सारखी होऊ नये. जनतेचा सदाशिवराव भाऊ होऊ नये.

>> पंतप्रधानांनी स्पष्ट सांगावे; जे सांगितले तेच घडावे. उलट वागणाऱ्यांना अद्दल घडवावी. फक्त `मरकज’वालेच नियम मोडतात असे नाही! मरकजवाल्यांवर करोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here