‌आज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: क्षयरोगाची लक्षणे आढळून येत असलेल्या अनेक रुग्णांना दुसऱ्या-तिसऱ्या लाटेमध्ये करोना झाल्याचेही वैद्यकीय तपासणीच्या दरम्यान आढळून आले आहे. त्यामुळे करोना होऊन गेल्यानंतर टीबी होण्याची शक्यता रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये बळावते का, यादृष्टीने आरोग्यविभागाने अभ्यासाची सुरुवात केली आहे.

करोना संसर्गाचा जोर वाढता असताना, टीबीचा संसर्ग असलेल्या रुग्णांना करोनाची लागण झाल्याची कमी प्रकरणांची नोंद झाली होती. मात्र, आता टीबीच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसते. उपलब्ध माहितीनुसार २०१९मध्ये ६० हजार ५९७ टीबीच्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यामध्ये एमडीआर प्रकारच्या टीबीची लागण ५,६७३ रुग्णांना झाली होती. २०२०मध्ये या रुग्णसंख्येमध्ये घट होऊन ती ४३ हजार ४६४ इतकी नोंदवण्यात आली या वर्षात ४,३६७ जणांना एमडीआर टीबीच लागण झाली. २०२१मध्ये टीबीने पुन्हा उचल खाल्ली असून शहरात ५८ हजार ८४० जणांमध्ये टीबीची नोंद झाली, तर २०२२च्या पहिल्या तीन महिन्यांत १३,०९२ जणांना हा संसर्ग झाल्याचे दिसून येते. डॉ. प्रणिता टिपरे यांनी २०२१मध्ये टीबी असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र, हा आजार नियंत्रणात राहावा यासाठी पालिका विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष मोहीमही राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. सीतेश रॉय यांनी करोनामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन टीबीसारखा आजार बळावल्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसंख्येमध्ये किती टक्के लोकांना टीबी असतो, याचा अभ्यास वेळोवेळी झालेला आहे. मात्र, करोना झाल्यानंतर टीबीची लागण झाली आहे का, याचाही संशोधनाच्या पातळीवर अभ्यास होणे गरजेचे आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

फुप्फुस पुनर्वसन केंद्र सुरू
टीबी आणि श्वसनाशी संबंधित विकारांमधून सावरण्यासाठी इतरही रुग्णांना उपचार पुरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालयात ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी शिवडी येथील टीबी उपचार रुग्णालयात पहिले फुप्फुस पुनर्वसन केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here