गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची बाजू सावरून घेतल्याचे समजते. मंत्रिमंडळाची औपचारिक बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत वार्तालाप झाला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील पेनड्राईव्ह बॉम्बमुळे महाविकासआघाडीचे नेते चांगलेच गांगरून गेले होते. यामध्ये विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या माध्यमातून भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासंबंधीचे संभाषण होते. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातील हे संभाषण उघड झाल्याने महाविकास आघाडीची चांगलीच गोची झाली होती. मात्र, त्यानंतर महाविकासआघाडीचे नेते आणि प्रवीण चव्हाण यांनी ऑडिओ-व्हीडिओ क्लीपच्या सत्यतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु, थेट विशेष सरकारी वकिलांच्या कार्यालयात कॅमेरा बसवून स्टिंग ऑपरेशन झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे लागल्या होत्या. परंतु, दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात आपल्या नेहमीच्या मवाळ स्वभावाला साजेशी अशी सावध भूमिका घेत भाषण केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एकही आरोप खोडून काढला नाही. आम्ही या सगळ्याची सीआयडीमार्फत चौकशी करू, असे सांगत दिलीप वळसे पाटील यांनी आपले भाषण आटोपते घेतले होते.
सुनील केदार बैठकीत आक्रमक
मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तुम्ही आम्हाला अधिकार द्या, मग आम्ही नागपूरात सर्वकाही बघून घेतो, अशा आशयाचे वक्तव्य सुनील केदार यांनी केले. गुलाबराव पाटील, दादा भुसे, जयंत पाटील आदी मंत्र्यांनीही मते मांडली. भाजपचे नेते धुतल्या तांदळासारखे नाहीत, असे जनतेचेही मत आहे. मात्र ज्याप्रकारे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे योग्य कायदेशीर सल्ले मिळत आहेत, ते आश्चर्यकारक आहे, असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले.