पाटणा : बिहारमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून विकासशील इन्सान पक्षाच्या (VIP) तीनही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. व्हिआयपीच्या राजू सिंह, मिश्री लाल आणि स्वर्णा सिंह यांनी भाजपचं कमळ हाती घेतल्याने व्हिआयपीचे अध्यक्ष आणि बिहार सरकारमध्ये मंत्री असलेल्या मुकेश सहानी यांना मोठा धक्का बसला आहे. (Mukesh Sahani Vip Party)

बिहारमध्ये २०२० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुकेश सहानी यांच्या व्हिआयपीने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदची साथ सोडली आणि भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली. या निवडणुकीत सहानी यांच्या पक्षाने ११ जागा लढवत ३ जागांवर यश मिळवलं होतं, तर स्वत: सहानी हे नंतर विधानपरिषदेचे आमदार होऊन नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले होते. मात्र आता मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच आमदार फोडल्याने मुकेश सहानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Uddhav Thackeray: मंत्रिमंडळाच्या बैठकीतून ज्येष्ठ मंत्र्यांचा काढता पाय, उद्धव ठाकरे यांची मार्मिक टिप्पणी

भाजपने का केलं ‘ऑपरेशन व्हिआयपी’?

अवघ्या २ वर्षांपासून झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाला सोबत घेतलं त्याच पक्षाचे आमदार आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने नेमके का प्रयत्न केले, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. खरंतर गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप आणि मुकेश सहानी यांच्यामध्ये मतभेद सुरू होते. यातूनच सहानी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात व्हिआयपीचे ५३ उमेदवार मैदानात उतरवले होते. यामुळे भाजप नेतृत्व मुकेश सहानी यांच्यावर नाराज झाले होते.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात नाराजी नाट्य, बॅनरवरील ‘एका’ फोटोवरुन अंतर्गत कुजबूज

दुसरीकडे, विधानपरिषद निवडणूक आणि बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही मुकेश सहानी यांनी भाजपविरोधात उमेदवारांची घोषणा केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आणि भाजपने ‘ऑपरेशन व्हिआयपी’ला सुरुवात केली. नुकतीच व्हिआयपीचे आमदार राजू सिंह, मिश्री लाल आणि स्वर्णा सिंह यांनी बिहारच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता अखेर या तीनही आमदारांनी व्हिआयपीतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, बिहार सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या मुकेश सहानी यांच्या राजीनाम्याची मागणीही भाजपकडून करण्यात आली असून लवकरच त्यांना मंत्रिपदावरून दूर केलं जाईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here