देशावर गेल्या काही दिवसांपासून करोनाचं संकट घोंगावत आहे. महाराष्ट्रात करोनाच्या साथीचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी वगळता लोकांना घरात बसून राहावं लागत आहे. जीवनशैलीत अचानक आलेल्या बदलाशी जुळवून घेणं अनेकांना कठीण जात आहे. एकाच वेळी सर्व घरात असल्यानं अनेक घरांमध्ये वाद होत असल्याच्याही बातम्या येत आहेत. चिडचिड वाढली आहे. एकीकडं साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती आहे. तर, दुसरीकडं लॉकडाऊन कधी संपणार याबद्दलची संभ्रमावस्था आहे. यामुळं एक अदृश्य ताण-तणाव जाणवतो आहे. हळव्या मनाच्या लोकांना मानसिक त्रास होण्याची शक्यता वाढली आहे. अशा मानसिक आजारांना सामोरं जाणाऱ्या नागरिकांना आधार देण्यासाठी राज्य महिला आयोग सरसावला आहे.
मानसिक स्वास्थ्य जपण्याच्या दृष्टीनं टीप्स देण्यासाठी व समुपदेशन करण्यासाठी आयोगानं पोद्दार फाउंडेशनच्या मदतीनं हेल्पलाइन सुरू केली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या चार भाषांमधे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत १८००१२१०९८० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. ही सुविधा मोफत असून स्त्री पुरुष कुणीही संपर्क करू शकतात. प्रशिक्षित समुपदेशक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करतील.
‘ताण-तणाव, चिडचिड होणे, भीती वाटणे, सतत मूड बदलणे असे त्रास असलेल्यांना या हेल्पलाईनचा उपयोग होईल, असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या सचिव यांनी व्यक्त केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times