लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवत भाजपने ऐतिहासिक विजय साकारला. उत्तर प्रदेशात १९८५ नंतर कोणत्याही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्यात यश आलं नव्हतं. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपने यंदा ही किमया करून दाखवली. योगी आदित्यनाथ हे लवकरच पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून हा शपथविधी सोहळा (Yogi Adityanath Oath Ceremony Lucknow) भव्य-दिव्य करण्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यामधील काही नावांवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही रंगू लागली आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या शपधविधी सोहळ्यासाठी विरोधी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांपासून उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. भाजपचे सर्व मोठे नेते या सोहळ्याला उपस्थित असणारच आहेत, पण त्याशिवायच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण दिलं गेलं आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, सपाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्यासह इतर नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.

‘२४ तासांत निर्णय घ्या’, चंद्रकांत पाटलांची काँग्रेसला ऑफर, राजकीय हालचालींना वेग

दुसरीकडे, मुकेश अंबानी, गौतम अदानी, आनंद महिंद्रा यांच्यासह इतर मोठे उद्योगपतीही योगींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.

लखनौमध्ये जय्यत तयारी

भाजप कार्यकर्त्यांमध्ये ‘बुलडोजर बाबा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी लखनौमध्ये प्रचंड प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. योगी यांचा शपथविधी पाहण्यासाठी भाजपचे राज्यभरातून ४५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here