मुंबई : मुंबईकरांसाठी रविवार म्हणजे कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचा दिवस असतो. पण मैदानाअभावी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येत्या रविवारी मुंबईतील १३ रस्ते हे ३ तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. खरंतर, पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबईचे वाहतूक पोलीस एक अनोखा उपक्रम सुरू करणार आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे या रविवारी मुंबईत १३ रस्ते तीन तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना पाहण्यासाठी किंवा उपक्रमात सहभागी होण्यासाठी हे रस्ते खुले असतील. यावेळी तुम्ही रस्त्यावर चालणे, सायकलिंग, स्केटिंग, योगासने करू शकता. मुले रस्त्यावर खेळूही शकतात. या खास उपक्रमाचं मुंबईकरांकडूनही स्वागत करण्यात आलं आहे.
आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई पोलिसांनी आणि नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. तर या १३ रस्त्यांमध्ये मरीन ड्राइव्ह, वांद्रे बँडस्टँड, ओशिवरा, बोरिवली आणि मुलुंड यांचा समावेश आहे. रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत हे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून फक्त नागरिकांसाठी खुले असणार आहेत.