
पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स प्रस्तुत मटा सन्मान २०२२ पॉवर्ड बाय सारस्वत बँक को पॉवर्ड बाय महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या सोहळ्यासाठी यंदा चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज या तीन क्षेत्रांमध्ये नामांकने जाहीर झाली आहेत. मनोरंजन क्षेत्रातील पुरस्कारासोबतच या सोहळ्यामध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ आणि ‘युथ आयकॉन’, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने देण्यात येणारा ‘वसुंधरा साथी सन्मान’ याचीही मराठी वाचक आणि रसिकांना उत्सुकता असते.
सिनेमा, नाट्य, मालिका आणि गेल्या वर्षापासून वेबसीरिजलाही आपल्या कवेत घेऊन ‘मटा सन्मान’ने मनोरंजन विश्वातील कौतुक सोहळा अधिक व्यापक केला आहे. या तिन्ही क्षेत्रांतील कलाकारांसह तंत्रज्ञ आणि लेखकांना ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सर्वप्रथम कौतुकाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यंदाचा हा २२वा मटा सन्मान सोहळा आहे. यामध्ये चित्रपट श्रेणीत १५, वेबसीरिज श्रेणीत पाच, तर मालिका श्रेणीमध्ये १० अशी एकूण ३० मानांकने आहेत. चित्रपट श्रेणीत ‘धुरळा’, ‘झिम्मा’, ‘बोनस’, ‘दिठी’ आणि ‘कारखानीसांची वारी’ या चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीची स्पर्धा आहे. ‘ईडक’, ‘मन फकिरा’, ‘जून’, ‘चोरीचा मामला’ यांनीही विविध मानांकनांमध्ये स्थान मिळवले आहे.