लखनौ : योगी आदित्यनाथ यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर आज ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दुपारी ४ वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपने सर्व मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. तसंच विरोधी पक्षातीलही अनेक दिग्गज नेत्यांना या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. योगी आदित्यनाथ यांची ही मुख्यमंत्रिपदाची दुसरी टर्म असणार आहे. त्यामुळे योगी आपल्या मंत्रिमंडळात जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी देतात, की काही नवीन चेहऱ्यांचा समावेश करतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. (Yogi Adityanath Oath Taking Ceremony)

योगी आदित्यनाथ यांच्यासोबत आज ४५ ते ४७ इतर मंत्रीही शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री उशिरा राजभवनाकडे या मंत्र्यांची यादी पाठवण्यात आल्याचे समजते. योगींच्या मंत्रिमंडळात सात ते आठ महिला मंत्र्यांचाही समावेश असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र या यादीत नेमका कोणा-कोणाचा नंबर लागला आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

गरीब नागरिक तुमचं सरकार पाडू शकत नाहीत म्हणूनच हे चाललंय ना?; मुख्यमंत्र्यांना सामाजिक कार्यकर्त्याचा थेट सवाल

योगींनी फोन करून दिलं निमंत्रण

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला राजकीय क्षेत्रासोबत उद्योग, क्रीडा आणि कला क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी स्वत: फोन करून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, सपाचे संस्थापक मुलायम सिंह, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना फोन करून निमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह

योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे हजारो कार्यकर्ते लखनौमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली असून दुपारपर्यंत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here