Nitesh Rane | माझ्या शरीरात चुकीचं औषध टाकून मला रुग्णालयातच संपवण्याचा कट ठाकरे सरकारने आखला होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. माझा बीपी आणि सर्व गोष्टी लो होत्या ते मला कळत होत्या.

 

Nitesh Rane (7)
नितेश राणे

हायलाइट्स:

  • छातीत दुखत असल्याने कोल्हापूरच्या रुग्णालयात नितेश राणे यांची अँजिओग्राफी करावी, असा डॉक्टरांचा आग्रह होता
  • पण मला तशी गरज वाटत नसल्याचे मी डॉक्टरांना सांगितले
मुंबई: संतोष परब हल्लाप्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असताना मला ठार मारण्याचा कट आखण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक झाली होती. त्यावेळी सावंतवाडी कारागृहात असताना नितेश राणे यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर सुरुवातीला कणकवली जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांच्या छातीचे दुखणे कायम असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले होते. त्यावेळी मला रुग्णालयातच मारण्याची योजना आखली होती, असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केला.

छातीत दुखत असल्याने कोल्हापूरच्या रुग्णालयात नितेश राणे यांची अँजिओग्राफी करावी, असा डॉक्टरांचा आग्रह होता. पण मला तशी गरज वाटत नसल्याचे मी डॉक्टरांना सांगितले. माझा रक्तदाब आणि शुगर लेव्हल कमी असली तरी मला सर्व गोष्टी कळत होत्या. सीटी अँजिओ चाचणी करण्यासाठी रुग्णाच्या शरीरात इंक टाकावी लागते. यादरम्यान रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने मला येऊन सांगितले की, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सीटी-अँजिओ करून घेऊ नका. तुमच्या शरीरात इंक टाकून तुम्हाला मारण्याचा प्लॅन आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या टेस्टला होकार देऊ नका, असे त्या कर्मचाऱ्याने मला सांगितल्याचा दावा नितेश राणे यांनी केला. एखाद्या व्यक्तीला चुकीचं इंजेक्शन, चुकीचं औषध देऊन देऊन कायमस्वरूपी संपवून टाकायचे, याला ठाकरे सरकार म्हणतात. या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे. ठाकरे सरकारला विरोधी नेत्यांना सभागृहातच येऊन द्यायचे नाही. त्यांना जिवंतही ठेवायचे नाही, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.

‘माझी प्रकृती खालावली असतानाही २०० पोलीस मला अटक करायला आले होते’

कोल्हापूर सिव्हिल रुग्णालयात असताना रक्तदाब आणि शुगर कमी झाल्याने माझी प्रकृती खालावली होती. तरीही मला अटक करण्यासाठी रात्री अडीच वाजता २०० पोलिसांचा फौजफाटा पाठवण्यात आला होता. पोलिसांनी आत्ताच्या आता नितेश राणे यांना अटक करा,अशा धोशा लावला होता. मात्र, माझी अवस्था पाहिल्यानंतर पोलीस बाहेर गेले. माझी प्रकृती व्यवस्थित नसतानाही मला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात होता. नितेश राणे यांना कोणत्याही परिस्थितीत अटक करा, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्याचा दावा नितेश राणे यांनी केला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : thackeray government plan to kill me by putting ink into my body during ct ngo test says bjp nitesh rane
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here