मनमाड : एक म्हण आहे की ‘देव तारी त्याला कोण मारी’ याचाच प्रत्यय निफाड तालुक्यातील ओझर येथील नागरिकांना आला आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्यानंतर देखील ३ वर्षाचा फैजान शेख हा चिमुकला चमत्काररित्या बचावला आहे. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.
ओझरच्या चांदनी चौकातील अलसना अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर शेख फॅमिली राहते. ३ वर्षांचा फैजान गॅलरीत खेळत असताना अचानक खाली पडला आणि बेशुद्ध झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला कुठेही मार लागलेला नसल्याचे निष्पन्न झाले.
काही वेळात हा चिमुरडा शुद्धीत आला आणि त्याला सुखरुप पाहून त्याच्या आईला आनंदअश्रू अनावर झाले. तिसऱ्या मजल्यावरून पडून देखील फैजानला साधी इजाही झाली नसल्याने देव तारी त्याला कोण मारी असंच म्हणावं लागेल.