मुंबई : राज्यातील आमदारांसाठी मुंबईत ३०० घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्यानंतर सरकारवर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमदारांना ही घरे मोफत दिली जाणार नसून त्यांच्याकडून पैसे घेण्यात येणार आहेत, असा खुलासा आव्हाड यांनी केला आहे. (Jitendra Awhad Tweet)

‘आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होत आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत तसंच बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे,’ अशी माहिती ट्वीट करून जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. आव्हाड यांच्या स्पष्टीकरणानंतर सरकारच्या निर्णयावर होणारी टीका थांबते का, हे पाहावं लागेल.

Sanjay Raut: आमदारांना मोफत घरं देण्याच्या निर्णयावर संजय राऊतांची असहमती, वाचा नेमकं काय म्हणाले…

मनसे आमदारानेही साधला निशाणा

राज्य सरकारकडून आमदारांना मोफत घरे दिली जाणार असल्याची माहिती समोर येताच सर्वसामान्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत होता. या निर्णयावरून आमदारांनाही टीकेचं लक्ष्य केलं जात होतं. त्यामुळे संतापलेल्या मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. ‘आमदारांना मोफत घरे कशासाठी ? घोषणा तुम्ही करता, पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत वीज द्या व जनतेचे आशीर्वाद मिळवा,’ असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या निर्णयावर राज्यभरात प्रतिक्रया

आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावर सोशल मीडियात सर्वसामान्य नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत असताना लोकप्रतिनिधींनीही या निर्णयावर भाष्य केलं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सरकारविरोधात हल्लाबोल केला होता. तसंच सत्ताधारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आपण या निर्णयाबाबत असहमत असल्याचं सांगितलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here