मुंबई: दिल्लीच्या निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्यांना स्वत:हून समोर येऊन उपचार करून घेण्याचं आवाहन करूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या तबलिगी जमातच्या १५० जणांविरोधात अखेर महापालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाला तबलिगी जमातचे काही कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. त्यानंतर हे लोक मुंबईत आले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने करोनाच्या पार्श्वभूमीवर या लोकांना स्वत:हून स्वत:ची माहिती देण्याचं आणि उपचार करून घेण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, तरीही कोणीही समोर न आल्याने महापालिकेने अखेर आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात जाऊन सुमारे १५० तबलिगींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

९० टक्के रुग्ण तबलिगींच्या संपर्कातील
दरम्यान, मुंबईत आढळलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे तबलिगींच्या संपर्कातील असून इतर रुग्ण हे केवळ दहा टक्केच असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली आहे. मुंबईतील आकडा ५००च्यावर गेला आहे. यातील बहुतेक रुग्ण हे दुबई आणि दिल्लीतील निजामुद्दीन येथून आलेल्यांच्या संपर्कातील असल्याचं परदेशी यांनी म्हटलं आहे. मात्र, मुंबईत कम्युनिटी ट्रान्स्फर झालेलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईत साडे दहा हजार टेस्ट करण्यात आल्या असून टेस्ट वाढवत असल्याने रुग्णही सापडत असल्याचं ते म्हणाले. वरळी आणि धारावीचा परिसर सील करण्यात आला आहे. येथील ४०० लोकांना पोद्दार रुग्णालय आमि कोळी सभागृहात ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली असून मुंबईत ड्रोनद्वारे लक्ष्य ठेवलं जात असल्याचंही ते म्हणाले.

मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळल्याने लॉकडाऊन वाढवायचा की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. मुंबईच्या हिताचा जो काही निर्णय असेल तो मुख्यमंत्री घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here