जळगाव : धावत्या रिक्षातून तोल जाऊन खाली पडलेल्या १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी जळगाव जिल्ह्यात घडली आहे. तृप्ती भगवान चौधरी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. एसटी बस सेवा बंद असल्यामुळे तृप्ती रिक्षाने प्रवास करत होती. मात्र हाच प्रवास तिच्यासाठी जीवघेणा ठरला असल्याचं या घटनेनंतर स्पष्ट झालं आहे. (Rickshaw Accident Maharashtra)

तृप्ती चौधरी ही विद्यार्थिनी बोदवड येथील न. ह. रांका महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखेचं शिक्षण घेत होती. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने तृप्ती रिक्षानेच महाविद्यालयात ये-जा करत होती. कॉलेजची वेळ सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत असल्याने ती नेहमीप्रमाणे गुरुवारी महाविद्यालयात आली. कॉलेज सुटल्यानंतर ती मैत्रिणींसोबत शेलवड येथे जाण्यासाठी निघाली. यावेळी तृप्ती रिक्षाच्या पुढील सीटवर बाहेरील बाजूने बसली. प्रवासात अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रीण रोहिणी राजेंद्र धनगर या दोघीही खाली पडल्या.

तृप्ती बाहेरच्या बाजूने असल्याने तिच्या डोक्याला व मेंदूला गंभीर इजा झाली. यानंतर तिला तातडीने बोदवड येथील डॉ. यशपाल बडगुजर यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला जळगावला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र जळगावला नेत असताना वाटेतच तृप्तीची प्राणज्योत मालवली. जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होऊन त्यानंतर दुपारी ४ वाजता शेलवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Pratap Sarnaik: शिवसेनेला आणखी एक झटका, ‘ईडी’कडून प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाखांची संपत्ती जप्त

‘…तर माझी एकुलती एक मुलगी वाचली असती’

विद्यार्थ्यांसाठी तालुक्यात एसटी बसच्या दिवसभरातून २१ फेऱ्या होत होत्या. मात्र, काही महिन्यांपूर्वी एसटीचा संप सुरू झाला. परिणामी सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेक खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहने चालवतात. तृप्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ‘आज एसटी बस सुरू असत्या तर माझ्या मुलीचा जीव वाचला असता,’ अशा शब्दांत वडील भगवान चौधरी यांनी मुलगी तृप्तीच्या मृत्यूनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, या प्रकारच्या अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने एसटी संपाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here