मुख्यमंत्र्यांच्या संयमाचा बांध फुटला; कुटुंबावर आरोप करणाऱ्या भाजपला खुलं आव्हान – chief minister uddhav thackeray openly challenged the bjp over allegations against thackeray family
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीचे नेते आणि ठाकरे कुटुंबासह नातेवाईकांवर सुरू असलेल्या कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आक्रमक पलटवार केला आहे. (Uddhav Thackeray Slams Bjp) ‘एकमेकांच्या कुटुंबाची बदनामी करणं ही विकृत गोष्ट आहे. कुटुंबावर आरोप करायचे, धाडी टाकायच्या, हे काय चाललंय? तुम्हाला सत्ता हवी आहे म्हणून तुम्ही कुटुंबाला तणावाखाली ठेवत आहात, माझ्या कुटुंबाला बदनाम करून त्यांच्यावर धाडी टाकत आहात ना? चला सगळ्यांसमोर सांगतो, मीच तुमच्यासोबत येतो. पण सत्तेसाठी नाही येणार, तर तुम्ही मलाच तुरुंगात टाका,’ असं खुलं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे.
कुटुंबावर होणाऱ्या आरोपांमुळे आणि नातवाईकांवर ईडी आणि अन्य संस्थांनी केलेल्या कारवाईमुळे उद्विग्न झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘मलाच अडचणीत आणायचं असेल तर थेट माझ्या अंगावर या, कुटुंबाची कशाला बदनामी करता? आम्ही कधी तुमच्या कुटुंबाची बदनामी केली आहे का? कधी तुमच्या कुटुंबाच्या भानगडी बाहेर काढल्या आहेत का?’ असा तिखट सवालही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. राज्यपालांचा विधानसभेत एवढा अपमान क्वचितच झाला असेल; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
‘बाळासाहेबांनी तुमच्या ज्या नेत्यांना वाचवले ते वर गेल्यावर बाळासाहेबांना काय उत्तर देणार? तुम्ही शिवसैनिकांच्या घरात शिरू नका,’ असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाजप नेत्यांसह केंद्र सरकारविरोधात आज विधानसभेतील भाषणातून रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा सामना आणखी टोकदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज केलेल्या घणाघाती टीकेनंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.