मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बोगस मजूर प्रकरणात सत्र न्यायालयाने प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे दरेकर यांच्या अडचणी आणखी वाढल्याचे बोलले जाते. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर दरेकर यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. पण मुंबई उच्च न्यायालयात अपील करता यावे, यासाठी मंगळवार, २९ मार्च रोजीपर्यंत अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण दिले आहे. न्यायालयाने मंगळवारपर्यंत दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या माध्यमातून दिलासा मिळेल, असा विश्वास आहे. न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे मी या सर्व प्रकरणाला सामोरे जाईल. तिसऱ्यांदा जसा दिलासा मिळाला, तसाच उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेल. मला न्याय मिळेल असा विश्वास आहे, असे दरेकर म्हणाले.
तत्पूर्वी, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बोगस मजूर प्रकरणात दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होऊन, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी दोन आठवड्यापर्यंत अटकेपासून असलेले अंतरिम संरक्षण कायम राहावे, अशी विनंती दरेकर यांच्यामार्फत त्यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना २९ मार्चपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे.