दिल्ली महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्याचे संकेत मिळाल्यानंतर, आम आदमी पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. भाजपला पराभवाची भीती वाटत असल्याने दिल्लीतील तीन महापालिका एकत्र करण्याचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारने घेतल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले होते. त्याबाबतही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. दिल्लीच्या निवडणुका भाजपला सोप्या नाहीत. फक्त महानगरपालिका नाही, तर लोकसभा निवडणुकाही भाजपसाठी सोप्या नसून, भाजपला याची जाणीव असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. एकीकडे भाजपच्या शाखा झपाट्याने वाढत आहेत. शिवसेनेच्याही शाखा वाढत आहेत. पण, आमच्या शाखेमध्ये समाजसेवा होते, लोकांची कामे होतात, असा खोचक टोलाही राऊत यांनी भाजपचे नाव न घेता लगावला.
उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं. भाजपची पुन्हा सत्ता आली. योगी आदित्यनाथ हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना शुभेच्छा दिल्या. लोकशाहीमध्ये ज्यांच्यावर जनता विश्वास ठेवते, तोच नेता असतो. योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आम्ही नेहमी प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे. योगी आदित्यनाथ हे मोठे नेते असून, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देतो, असे यावेळी संजय राऊत म्हणाले.