मुंबई : महेंद्रसिंग धोनीने यावेळी अर्धशतक झळकावत आपल्यामध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक असल्याचे दाखवून दिले. धोनीने कर्णधारपरद सोडले असले तरी तो एक जगविख्यात फलंदाज आहे, हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. चेन्नईने पहिल्या सामन्यात आपला अर्धा संघ ६१ धावांमध्ये गमावला होता. त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजांनी पहिल्याच सामन्यात हाराकिरी पत्करल्याचे पाहायला मिळाले होते, पण धोनीने त्यानंतर दमदार फलंदाजी करत संघाला सावरले. त्यामुळेच चेन्नईचा पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सपुढे १३२ धावांचे आव्हान ठेवता आले. धोनीने यावेळी ३८ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५० धावांची खेळी साकारली.

रवींद्र जडेजाला यावेळी पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकता आली नाही. केकेआरच्या संघाने नाणेफेक जिंकत चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पण पहिल्या षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर केकेआरने चेन्नईला पहिला धक्का दिला. केकेआरने पहिल्याच षटकात चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला बाद केले, ऋतुराजला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. ऋतुराज बाद झाल्यावर चेन्नईच्या संघातून पहिल्यांदाच खेळणाऱ्या डेव्हॉन कॉनवेलाही फक्त ३ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर रॉबिन उथप्पाने संघाचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला आणि २८ धावा केल्या. पण शेल्डन जॅक्सनने त्याला अप्रतिमपणे स्टम्पिंग केले, त्याला २८ धावा करता आल्या. यावेळी चेन्नईचा पाच चेंडूंमध्ये दोन धक्के बसले. उथप्पा बाद झाल्यावर पाचव्या चेंडूवरच अंबाती रायुडूही १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेलाही फक्त तीन धावा करता आल्या. त्यामुळे चेन्नईची ५ बाद ६१ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर काही काळ आजी-माजी कर्णधार रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी फलंदाजी केली. हे दोघे चेन्नईच्या संघाला मोठी धावसंख्या उभारून देतील, असे वाटत होते. कारण या दोघांनीही सुरुवातीला सावध सुरुटवात केली होती. स्थिरस्थावर झाल्यावर हे दोघेही मोठी फटकेबाजी करतील, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण १७ षटकांपर्यंत चेन्नईच्या संघाला फक्त ८४ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात चेन्नईचा संघ १५० धावांपर्यंत मजल मारणार नाही, हे स्पष्ट दिसत होते.

file photo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here