पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरुच असून, सहाव्या दिवसातील ही पाचवी दरवाढ आहे. आज, रविवारी पेट्रोल प्रतिलिटर ५० पैसे आणि डिझेल प्रतिलिटर ५५ पैशांनी महागले आहे. या नव्या दरांनुसार, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर ९९.११ रुपये झाले आहे. तर डिझेल प्रतिलिटर ९०.४२ रुपये झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ११३.८१ रुपये, तर डिझेल प्रतिलिटर ९८.०५ रुपयांना विकले जात आहे.
यापूर्वी, पेट्रोलियम कंपन्यांनी २२ मार्च, २३ मार्च, २५ मार्च आणि २६ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली होती. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असून, पेट्रोलियम कंपन्या त्याचा भार ग्राहकांवर टाकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे इंधन दरांत सातत्याने वाढ केली जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जवळपास साडेचार महिने स्थिर राहिल्यानंतर २२ मार्च रोजी प्रतिलिटर ८० पैशांनी वाढ करण्यात आली. त्यानंतर सलग तीन वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरांत प्रतिलिटर ८० पैशांनी वाढ करण्यात आली. चार वेळा किंमती वाढवल्याने पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर एकूण ३.२० रुपयांनी महागले आहे.