मिळालेल्या माहितीनुसार, मोहन वाधवा यांचे उल्हासनगरच्या कॅम्प ५ परिसरात जीन्सचं दुकान आहे. ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मोहन हे दुकानात बसलेले असताना, एक तरूण ग्राहक बनून आला. तुमची दुकानाबाहेर असलेली चप्पल कुणीतरी उचलून गल्लीत फेकल्याचं त्यानं मोहन यांना सांगितलं. त्यामुळं मोहन हे उठून दुकानाबाहेर गेले. दुकानात आलेल्या तरूणाने गल्ल्यातील १ लाख ८६ हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला. या प्रकरणी मोहन यांच्या तक्रारीनुसार हिललाईन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासाला सुरुवात केली. यामध्ये साहिल कुकरेजा आणि राजवीर सिंग लबाना या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चोरीला गेलेल्या रकमेपैकी काही रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. त्यांनी इतर ठिकाणीही चोरी केली होती का? याचा तपस पोलीस करत आहेत.
हे दोघेही सराईत चोरटे आहेत. या दोघा आरोपींना अखेर शोधून काढले. बरेच दिवस त्यांचा शोध सुरू होता. दोघांना अटक करण्यात यश आले, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या भागात गेल्या काही दिवसांत अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांची उकल करण्याचे आव्हानही पोलिसांसमोर आहे.