अहमदनगर : ‘अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) होत असलेल्या कारवायांसंबंधी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होणारी टीका अनाठायी आहे. जे निर्दोष आहेत, त्यांनी तसे पुरावे सादर करावेत. फक्त टीव्हीवर येऊन, टीका करून काय उपयोग? चोरांना पकडून त्यांच्यापासून देशाचे रक्षण करणे, हे तर चौकीदाराचं काम असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला देशाचे चौकीदार म्हणतात. त्यामुळे ते हेच काम करत आहेत,’ असं म्हणत अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांचं जोरदार समर्थन केलं आहे. (Sujay Vikhe Patil On Maharashtra Politics)

खासदार सुजय विखे नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ईडीच्या कारवाया आणि त्यावरून होणारे आरोप यासंबंधी विचारले असता ते म्हणाले, ‘जे कोणी नेते या कारवायांवरून टीका करीत आहेत, त्यांनी लक्षात घ्यावे की ज्यांनी चोऱ्या केल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई होणारच. जर ते निर्दोष असतील तर त्यांनी कागदपत्रांसह सिद्ध करावे. केवळ टीका आणि राजकीय आरोप करून काय साध्य होणार? मात्र, त्यांच्याकडे असे पुरावेच नाहीत, त्यामुळे ते यंत्रणेला आणि केंद्र सरकारला बदनाम करण्यात धन्यता मानत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला या देशाचे चौकीदार मानतात. अशा चोरांना पकडून शिक्षा देणे, त्यांच्यापासून देशाला वाचवणं हेच चौकीदाराचं काम आहे, ते मोदी चोखपणे करत आहेत,‘ असंही विखे पाटील म्हणाले.

जगभरात ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा धुमाकूळ; रुग्णसंख्येत प्रचंड वाढ!

वयोश्री योजनेत नगर जिल्हा देशात अव्वल

केंद्र सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेले साहित्य मोफत पुरवण्यासाठी वयोश्री योजना सुरू आहे. त्यासंबंधी सांगताना सुजय विखे पाटील म्हणाले, ‘या योजनेत नगर जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. देशभरासाठी १०० कोटीचे उद्दिष्ट्य ठरवण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ४० कोटींचे साहित्य वाटप एकट्या नगर जिल्ह्यात करण्यात आले आहे. सुमारे ४० हजार ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळाला आहे. यासंबंधी प्रझेटेशन्स करण्याची संधी या भागाचा खासदार म्हणून मला मिळाली आहे. मंगळवारी दिल्लीत आपण हे सादरीकरण करणार आहोत. यात आणखी काही कल्पना आणि अंमलबजावणीची पद्धत मी सूचवणार आहोत. नगरचा खासदार म्हणून ही संधी मिळाली असली तरी मनात एक खंत आहे. ती म्हणजे ज्या अर्थी एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहित्य वाटप करण्याची वेळ आली, त्या अर्थी एवढ्या मोठ्या संख्येने हे ज्येष्ठ नागरिक उपेक्षित आहेत. एक तर त्यांची परिस्थिती नाही किंवा त्यांच्या कुटुंबाकडून दुर्लक्ष होत असावे, याची खंत वाटते. त्यामुळे जास्तीत जास्त आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत ही योजना कशी पोहचवता येईल, याचे आपण दिल्लीत सदरीकरण करणार आहोत,’ असंही सुजय विखे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here