मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केल्यानंतर आता राऊत यांनीही आपल्या खोचक शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपने शिवसेनेची केलेली चेष्टा किती महागात पडली आहे, याचा अनुभव तुम्ही घेत आहात, असं संजय राऊत यांनी पाटील यांना उद्देशून म्हटलं आहे. (Sanjay Raut Vs Chandrkant Patil)

संजय राऊत यांना माझी चेष्टा करणं महागात पडणार आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला इशारा दिला होता. चंद्रकांत पाटलांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी म्हटलं आहे की, ‘नव्या धमकीबद्दल धन्यवाद, पण महागात पडेल म्हणजे काय? ईडीला सोबत घेऊन आणखी एक खोटे कांड केलं जाणार. बदनामी मोहीम राबवण्यात येणार आणि मुलाबाळांना त्रास देणार, बरोबर ना? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबाबत जी भाषा तुम्ही वापरता, चेष्टा करता ते आम्ही सहन करायचे का? शिवसेनेसोबत तुम्ही जी चेष्टा केली होती तीच तुम्हाला महागात पडत आहे,’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

‘हेच तर चौकीदाराचे काम’; महाराष्ट्रातील भाजप खासदाराकडून ईडीच्या कारवाईचं समर्थन

राऊत-पाटील वादाचं कारण काय?

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’मध्ये आज संजय राऊत यांनी त्यांच्या ‘रोखठोक’ सदरातून चंद्रकांत पाटील यांच्यावर आक्रमक टीका केली आहे. ‘नरेंद्र मोदी २२ तास काम करतात आणि उरलेल्या दोन तासातही झोप येऊ नये म्हणून संशोधन सुरू आहे,’ असं चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. या विधानाचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेत चंद्रकांत पाटलांकडून चमचेगिरी सुरू असल्याचं म्हटलं. राऊत यांच्या या टीकेनंतर चंद्रकांत पाटील यांनीही प्रत्युत्तर देत राऊत यांना माझी चेष्टा महागात पडणार असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, संजय राऊत विरुद्ध चंद्रकांत पाटील हा राजकीय संघर्ष आगामी काळात आणखीनच वाढत जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना कसा धोबीपछाड दिला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here