सांगली : सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या उद्घाटनाचा तिढा आणखी वाढला आहे. कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारकाचे उद्घाटन ड्रोनद्वारे केल्याचा दावा भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. परंतु पोलीस प्रशासनाकडून त्यांचा दावा फेटाळण्यात आला आहे. प्रशासनाने स्मारक परिसरामध्ये जामर बसवल्यामुळे ड्रोन खाली कोसळल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच ड्रोन फिरवणाऱ्या दोघांसह एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते आमने-सामने आल्याने तणाव वाढला आहे. (Gopichand Padalkar Vs Sharad Pawar News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत २ एप्रिल रोजी सांगलीतील पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर स्मारकाचे उद्घाटन होणार आहे. मात्र त्या कार्यक्रमाला भाजपच्या नेत्यांना डावलल्याचा राग मनात धरून भाजपकडून २ एप्रिल पूर्वीच स्मारकाचं उद्घाटन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळाचा वेश धारण करून रविवारी सायंकाळी पुतळ्याचे लोकार्पण करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर स्मारक परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटलांनी इशारा देताच राऊतांनीही केला पलटवार; खोचक शब्दांत म्हणाले…

स्मारकाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले होते. दुपारी ३ नंतर आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक हळूहळू भारत सूत गिरणी चौकांमध्ये जमू लागले. काही वेळाने भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रॅली चौकात आली. या रॅलीमधील महिलांनी पोलिसांची हुज्जत घालत, बॅरिकेट तोडून आत प्रवेश केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. बघता बघता सर्व जमाव स्मारकाच्या दिशेने धावू लागला. परंतु चाणक्य चौकामधील पोलीस व प्रशासनाच्या मोठ्या बंदोबस्तामुळे जमावाला तिथेच रोखण्यात आले.

दरम्यान, काही काळ या ठिकाणी शक्तिप्रदर्शन केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन ड्रोनद्वारे केल्याचं जाहीर केलं. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सांगलीतील भाजपच्या स्थानिक नेत्यांची भूमिका योग्य असल्याचं सांगत पाठिंबा दिला आहे. सांगली महानगरपालिकेतील महापौर वगळता सर्वत्र भाजपची सत्ता आहे. तरीही राष्ट्रवादीकडून भाजपच्या नेत्यांना जाणीवपूर्वक डावललं जात आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here