IPL 2022 : मुंबई : ‘महेंद्रसिंह धोनीचा आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय हा अचानक घेतलेला नव्हता. आयपीएल २०२१ दरम्यानच तो कर्णधारपद सोडणार होता, पण हे पद कधी सोडावे, याचा निर्णय पूर्णपणे धोनीवर सोडला होता,’ अशी माहिती चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक यांनी दिली.
आयपीएल २०२२ च्या पहिल्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. स्टीफन फ्लेमिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘गेल्या हंगामात माही माझ्याशी याबद्दल बोलला होता. हे पद सोडण्याच्या वेळेचा निर्णय त्यालाच घ्यावा लागणार होता. धोनीने जवळपास १२ हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले. यादरम्यान त्याने संघाला चार वेळा विजेतेपद मिळवून दिले, तर पाच वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने २४ मार्च रोजी सीएसकेचे कर्णधारपद त्याच्या विश्वासू मित्र रविंद्र जडेजाकडे सोपवले. जडेजा २०१२ पासून सीएसकेचा भाग आहे.
सीएसकेने निवेदनात असे म्हटले आहे की, धोनी या हंगामात आणि यापुढेही संघासोबत राहील. धोनी २००८ मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून सीएसकेचा भाग आहे. २०१६ आणि २०१७ मध्ये जेव्हा या संघावर बंदी घालण्यात आली, तेव्हा धोनीने या संघापासून फारकत घेतली होती.
स्टीफन फ्लेमिंगने सांगितले की, धोनीकडून जडेजाकडे कर्णधारपद सोपविण्याची प्रक्रिया सहज झाली. कोणत्याही दबावाशिवाय जडेजाला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एन श्रीनिवासन यांना टीममार्फत ही माहिती देण्यात आली.
पहिल्या सामन्यात चेन्नईला कोलकाता नाईट रायडर्सकडून सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार म्हणून रविंद्र जडेजाचा हा पहिलाच सामना होता. पहिल्या सामन्यात जडेजाने चांगले नेतृत्व केले पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्यामुळे आता पुढच्या सामन्यांमध्ये जडेजाच्या नेतृत्वामध्ये कोणते बदल होतात, याची उत्सुकता सर्वांना असेल. त्याचबरोबर जडेजाला यावेळी मैदानात महेंद्रसिंग धोनी कशी मदत करतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here